
रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे गावात आज (१० मे) दिवसभरात तब्बल १५ वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. वारंवार जाणाऱ्या विजेमुळे स्थानिक रहिवाशांसह छोट्या व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, तक्रार करण्यासाठी संपर्क साधला असता वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि कार्यालयाचे फोन ‘नॉट रिचेबल’ येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सत्रात दर तासाला वीज खंडित होत होती. मात्र, संध्याकाळनंतर या समस्येने रौद्र रूप धारण केले असून, दर १५ ते २० मिनिटांनी वीज गुल होत आहे. यामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे व्यापाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.
विक्रीसाठी फ्रीजमधील वस्तू खराब होण्याची भीती आणि व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता यामुळे व्यापाऱ्यांनी नुकसानीची भीती व्यक्त केली आहे. वीज कार्यालयाचे फोन बंद असल्याने तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
‘विकसित भारत’ की केवळ घोषणा? एका बाजूला देश महासत्ता होण्याच्या आणि विकसित भारताच्या गप्पा मारल्या जात असताना, ग्रामीण भागात साध्या विजेच्या मूलभूत सुविधेसाठी नागरिकांना तासनतास अंधारात राहावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
वरवडे गावातील या गंभीर समस्येकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



