पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून मंडणगड पंचायत समितीसमोर आंदोलन

मंडणगड : तालुक्यातील म्हाप्रळ, कुंभार्ली गावांतील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून भाजप नेते ॲड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मंडणगड पंचायत समितीसमोर आंदोलन १३ मे रोजी आंदोलन केले.
जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे काम गेली दोन वर्ष झाले अपूर्ण आहे. याच विहिरीसाठी २०२५ साली कुंभार्ली गावातील ग्रामस्थांनी ॲड. वैभव खेडेकर यांचे नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला यश येऊन विहिरीचे काम पूर्ण झाले होते परंतु सदर विहिरीला खराब पाणी लागल्याने नागरिकांनी दुसऱ्या विहिरीची मागणी केली होती.
ही दुसरी विहीर सुद्धा मंजूर होऊन खूप दिवस झाले असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे या विहिरीचे काम पूर्ण होत नव्हते, अनेक दिवस उद्भवणारा पाण्याचा प्रश्न तसाच ऐरणीवर होता. याच अनुषंगाने १३ मे रोजी पुन्हा एकदा भाजप नेते ॲड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामस्थांनी मंडणगड पंचायत समिती समोर ठिया आंदोलन केले.
वैभव खेडेकर यांनी त्यांच्या आक्रमक शैलीमध्ये अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. या विहिरीचे काम लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन दिल्याने आंदोलन थांबवण्यात आले. या विहिरीचे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना त्यांच्या खुर्चीत बसून देणार नाही, असा इशारा खेडेकर यांनी अधिकाऱ्यांना दिला.



