स्विमिंग पूलमध्ये बुडून सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

राजापूर : कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी गेलेल्या एका निरागस चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे साखरी-नाटे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हसन सलमान कोतवडकर (वय ६ वर्षे, रा. साखरी-नाटे) हा आपल्या कुटुंबीयांसमवेत कोतापूर फाटा परिसरातील रिसॉर्टमध्ये फिरण्यासाठी गेला होता. काल (९ जून) सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास स्विमिंग पूल परिसरात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हसन पाण्यात बुडाला. काही वेळाने ही बाब लक्षात येताच उपस्थितांनी त्याला तातडीने बाहेर काढून जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केले. बेशुद्ध अवस्थेत त्याला धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
काही क्षणांपूर्वी कुटुंबीयांसोबत आनंदाने वावरणारा हसन अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याचे समजताच कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. एका निष्पाप जीवाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.
प्राथमिक माहितीनुसार पाण्यात बुडून गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे साखरी-नाटे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सागरी पोलीस ठाणे नाटेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजापूर येथे पाठविला आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण राजापूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनीदिली.


