नीट पेपरफुटीप्रकरणी रत्नागिरी ठाकरे शिवसेना आक्रमक
विद्यार्थ्यांना दरमहा २५ हजार देण्याची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदन

रत्नागिरी : नीट (UG) २०२६ परीक्षेचा पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्यामार्फत हे निवेदन सादर केले. यामध्ये NEET परीक्षा रद्द झाल्यामुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पेपर लीक करणारे, त्यांचे सूत्रधार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या शासकीय व निमशासकीय यंत्रणेतील सर्वांवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात असे प्रकार होणार नाहीत, परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा फेरपरीक्षेची तयारी करावी लागणार आहे. ग्रामीण व कोकणातील गरीब, मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना शहरात राहून अभ्यास करणे आर्थिकदृष्ट्या अशक्य आहे. त्यामुळे फेरपरीक्षा होईपर्यंत शासनाने प्रति महिना किमान २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात शासकीय वसतिगृहे मोफत किंवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावीत, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
“ही परीक्षा केवळ विद्यार्थ्यांची नव्हती, तर त्यांच्याशी जोडलेल्या लाखो गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या स्वप्नांची परीक्षा होती. पेपरफुटीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नैराश्य आणि मानसिक तणावाचे वातावरण आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांचीही स्वाक्षरी आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य आणि देशाच्या परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता या दोन्ही गोष्टी या प्रकरणाशी जोडल्या आहेत, त्यामुळे त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



