मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राजापूर तालुका जिल्ह्यात द्वितीय

३१.८६ टक्के विद्यार्थी पात्र; सलग यशाची परंपरा कायम

राजापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परीक्षेत राजापूर तालुक्याने उल्लेखनीय यश संपादन करत रत्नागिरी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. पात्र विद्यार्थ्यांच्या टक्केवारीच्या निकषावर राजापूर तालुक्याने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.

जिल्ह्यात रत्नागिरी तालुका ३६.१५ टक्के विद्यार्थी पात्रतेसह प्रथम क्रमांकावर राहिला असून, राजापूर तालुक्याने ३१.८६ टक्के पात्रतेसह दुसरे स्थान मिळविले आहे. गेल्या दोन वर्षांपासून राजापूर तालुका शिष्यवृत्ती परीक्षेत सातत्यपूर्ण यश मिळवत असून, यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखण्यात तालुक्याला यश आले आहे.

या यशामागे शिक्षकांचे परिश्रम, विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षण विभागाचे नियोजन महत्त्वाचे ठरल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे गटशिक्षणाधिकारी श्री. भोसले यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षापासून राजापूर तालुक्यात इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘राजापूर शिष्यवृत्ती अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

या अभियानामुळे विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा पाया अधिक मजबूत होत असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी वाढलेली जागरूकता, पालकांचा सहभाग आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

राजापूर तालुक्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिक्षण विभाग, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!