राजवाडी ब्राह्मणवाडीतील गरम पाण्याचे कुंड परिसराचा पर्यटन विकास वेगात
आमदार शेखर निकम यांच्याकडून पाहणी

संगमेश्वर : तालुक्यातील राजवाडी ब्राह्मणवाडी येथील प्रसिद्ध गरम पाण्याच्या कुंड परिसराचा पर्यटन विकास वेगाने सुरू असून, या ठिकाणी सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी केली.
राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून उपलब्ध निधीतून पर्यटकांच्या सोयीसाठी दोन मोठ्या कुंडांची निर्मिती, स्वच्छतागृहे, कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या तसेच अन्य मूलभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. या कामांची पाहणी करताना आमदार निकम यांनी समाधान व्यक्त केले. परिसर अधिक आकर्षक आणि पर्यटनपूरक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी आमदार निकम यांनी बाराव्या शतकातील ऐतिहासिक सोमेश्वर मंदिरालाही भेट दिली. मंदिर परिसराच्या जतन, संवर्धन आणि विकासाबाबत त्यांनी संबंधितांशी चर्चा केली. धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या या स्थळाच्या संवर्धनासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या राजगंगा नदीवरील गाळ उपसा कामाचीही त्यांनी पाहणी केली. नदी संवर्धनासोबत पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी हे काम महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
पर्यटन विकास, ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि पर्यावरण रक्षण या तिन्ही बाबींचा समतोल राखणाऱ्या या उपक्रमामुळे राजवाडी ब्राह्मणवाडी परिसराच्या विकासाला निश्चितच गती मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी सतीश कामत, राजेंद्र सुर्वे, संतोष भडवळकर, प्रभाकर घाणेकर, अमोल लोध, श्रीनिवास पेंडसे, विलास राऊत, खांबे गांवकर, सुहास लिगायत, नंदकुमार कलवारी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


