कोकण रेल्वेची तिकीट तपासणी मोहीम; एप्रिलमध्ये ३७ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवासी आढळले
दंड व थकीत भाड्यातून २.९० कोटींची वसुली; उन्हाळी हंगामात तपासणी आणखी कडक

रत्नागिरी : कोकण रेल्वे महामंडळ (केआरसीएल) ने एप्रिल २०२६ महिन्यात नियमित तिकीट तपासणी मोहिमेद्वारे ९३४ विशेष तपासणी उपक्रम राबविले. या मोहिमांमध्ये ३७ हजारांहून अधिक अनधिकृत व अनियमित प्रवाशांची प्रकरणे उघडकीस आली. संबंधित प्रवाशांकडून थकीत रेल्वे भाडे आणि दंडापोटी तब्बल २.९० कोटींची वसुली करण्यात आली.
केआरसीएलच्या माहितीनुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षात एकूण ११,३९४ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमांमधून ४,९९,६७५ अनधिकृत अथवा अनियमित प्रवाशांची प्रकरणे समोर आली असून, रेल्वे भाडे व दंडाच्या स्वरूपात एकूण २७.६८ कोटींची वसुली करण्यात आली आहे.
दरम्यान, कोकण रेल्वेने सर्व प्रवाशांना वैध तिकिटासह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. आगामी उन्हाळी सुट्टीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, सर्व प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने संपूर्ण मार्गावर तीव्र तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे केआरसीएलने स्पष्ट केले आहे.



