जिल्ह्यातील ७२८ शेतकऱ्यांची चौथी यादी प्रसिद्ध; आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

रत्नागिरी : शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या विशिष्ट क्रमांकाची चौथी यादी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये जिल्ह्यातील ७२८ पात्र शेतकऱ्यांचा समावेश असून, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांनी केले आहे.
ॲग्रीस्टॅक नोंदणी (फार्मर आयडी) अनिवार्य
कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ खात्यावर जमा होण्यासाठी शेतकऱ्यांकडे ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणी क्रमांक (फार्मर आयडी) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही नोंदणी केलेली नाही, त्यांनी विनाविलंब जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’त जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. चौथ्या यादीतील सर्व ७२८ पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्रात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे.
*यादी येथे पाहता येणार*
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ही चौथी यादी विविध महत्त्वाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे:
* संबंधित गावातील ग्रामपंचायत कार्यालये
* विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची कार्यालये
* रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (RDCC) च्या सर्व शाखा
* जिल्ह्यातील संबंधित राष्ट्रीयीकृत बँका व ग्रामीण बँका
सेवा केंद्रांना विशेष प्रशिक्षण
प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरळीत आणि विनाअडथळा पार पडावी यासाठी जिल्हा प्रकल्प कार्यालय, महाआयटी यांच्यावतीने जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रे आणि महा ई-सेवा केंद्रांच्या चालकांना सविस्तर ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच प्रमाणीकरणाची संपूर्ण कार्यपद्धती नागरिकांच्या माहितीसाठी सेवा केंद्रे व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांमध्ये फलकावर लावण्यात आली आहे.
पात्र शेतकऱ्यांनी कोणत्याही मध्यस्थावर अवलंबून न राहता थेट अधिकृत केंद्रांशी संपर्क साधावा आणि वेळेत प्रमाणीकरण पूर्ण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



