खेडमध्ये ७ जून रोजी कुणबी परिषदेचे आयोजन

खेड : कुणबी समाजातील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विषयांवर व्यापक चर्चा घडवून समाजामध्ये एकवाक्यता निर्माण करण्याच्या उद्देशाने कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा खेड ग्रामीण व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ७ जून रोजी कुणबी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद भरणे येथील जोगळे बंधू मल्टीपर्पज सभागृहात सकाळी ९.३० ते सायंकाळी ७ या वेळेत पार पडणार आहे.
परिषदेमध्ये विशेषतः लग्न समारंभातील रुढी-परंपरा, सामाजिक प्रथा, मृत्यूनंतरचे विधी तसेच त्यामागील सामाजिक व धार्मिक पैलू यावर सखोल चर्चा करण्यात येणार आहे. बदलत्या काळानुसार समाजहिताचे निर्णय घेण्यासाठी विविध मतप्रवाहांना एकत्र आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या परिषदेत कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे अध्यक्ष अनिल नवगणे, सरचिटणीस कृष्णा वणे, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे, शिवराज्य संघटना तथा ओबीसी संघर्ष समितीचे प्रवक्ते रोशन पाटील तसेच सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विजय थोरे हे मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेला खेड तालुक्यासह मुंबई, पुणे आणि इतर भागातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खेड ग्रामीण शाखेचे अध्यक्ष कृष्णा आग्रे आणि मुंबई शाखेचे अध्यक्ष शंकर बाईत यांनी केले आहे.



