जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी आचारसंहितेनंतर ठोस पाऊले उचलणार
जिल्हाधिकारी मनुज जिंदल : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यानंतर वेळ पडल्यास दंडात्मक कारवाई

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रमुख रस्ते, पर्यटन स्थळे, गड किल्ले, समुद्रकिनारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालेले दिसून येत असून त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येऊ शकतो. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत कठोर भूमिका घेण्यात येणार असून वेळे पडल्यास दंडात्मक कारवाई देखील करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी ४ जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले की, मी स्वतः रत्नागिरी शहरातील आणि काही गावातील समुद्रकिनाऱ्यांच्या ठिकाणी तसेच प्रभागांच्या ठिकाणी मी दौरा केला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य दिसून आले आहे. ज्यावेळी मी दौरा केला होता त्यावेळी मी संबंधित प्रशासनाला सूचना दिल्या होत्या मात्र तरी देखील स्वच्छतेच्या बाबतीत ठोस अशी कार्यवाही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून झालेली दिसून आली नाही. असे जरी असले तरी सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ठेवणे ही सर्वसामान्य नागरिकांची देखील जबाबदारी आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील गड किल्ले, समुद्रकिनारी, प्रमुख रस्ते या ठिकाणी स्वच्छतेसाठी विशेष आराखडा देखील तयार करण्यात येणार आहे. सार्वजनिक स्वच्छता व कचरा निर्मूलनासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार दिले आहेत. त्या आधारे सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीमध्ये प्रशासनाकडून किंवा कोणत्याही कंपनीकडून सार्वजनिक ठिकाणांची अस्वच्छता जर करण्यात येत असेल तर ठोस कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही.
त्याचप्रमाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत त्यामुळे या सर्व पर्यटकांना आवाहन करत आहोत की जो काही कचरा आपल्या माध्यमातून निर्माण होत असेल तो कचरा परत आपल्या घरी घेऊन जावा व त्याची विल्हेवाट आपल्या घरी लावावी किनाऱ्यावरती कचरा टाकण्यात येऊ नये. यासंबंधी लवकरच ग्रामपंचायत स्तरावर स्थापन झालेल्या बीच मॅनेजमेंट कमिटी देखील गठित करण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.



