मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा कोयत्याने खून

कोंडगाव (मंडणगड) हादरले : पती अटकेत

मंडणगड : तालुक्यातील कोंडगाव येथे चारित्र्याच्या संशयातून एका २२ वर्षीय विवाहितेचा तिच्याच पतीने कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (६ जून) दुपारी घडली. <span;>वैशाली मंगेश पवार (वय २२) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पती मंगेश निलेश पवार (वय २५) याला मंडणगड पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश पवार याला पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय होता. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शनिवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास वैशाली पवार या आपल्या घरासमोरील चिंचेच्या झाडाखाली उभ्या असताना पती मंगेशने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वैशाली यांना बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. मंगेशने त्यांच्या डोक्यावर आणि शरीराच्या वरच्या भागावर वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. काही क्षणांतच त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. हल्ला इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान मंडणगड पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिसराची पाहणी केली आणि पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

या प्रकरणी मृत महिलेचे नातेवाईक रामभाऊ सखाराम पवार यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी मंगेश पवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. खुनामागील नेमकी पार्श्वभूमी, कौटुंबिक वादाचे स्वरूप आणि इतर कारणांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, अवघ्या २२ वर्षांच्या तरुण विवाहितेचा संशयाच्या भावनेतून झालेला दुर्दैवी अंत परिसरातील नागरिकांना चटका लावून गेला आहे. कोंडगावमध्ये दिवसभर या घटनेची चर्चा सुरू होती. कौटुंबिक वाद आणि संशयातून घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी सामाजिक स्तरावर जनजागृतीची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे. मंडणगड पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!