श्री क्षेत्र परशुराम येथे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांची विकासकामांचा आढावा बैठक

रत्नागिरी : श्री क्षेत्र परशुराम येथील भगवान श्री परशुराम मंदिरात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्या अध्यक्षतेखाली परशुराम क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक संपन्न झाली. यावेळी संस्थान श्री भार्गवराम परशुरामचे अध्यक्ष जीवन रेळेकर व विश्वस्त डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी श्री. जिंदाल यांचे स्वागत केले.
बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच महसूल विभागाच्या प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मंदिर परिसरातील विकासकामे, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित रखडलेली कामे तसेच विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.
बैठकीस संस्थानचे अध्यक्ष जीवन रेळेकर, विश्वस्त डॉ. प्रशांत पटवर्धन, विश्वस्त संदीप थत्ते, सल्लागार रामचंद्र वडके, चिपळूणचे उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, खेडच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील व तहसीलदार सुधीर सोनवणे, सल्लागार समीर देसाई उपस्थित होते.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांनी परशुराम क्षेत्र विकास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सांस्कृतिक भवनाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच विविध विकासकामांतील अडचणी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी पंकज गोसावी, श्री. माडकर व सौ. जाधव, उपविभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता श्री. सुखदेवे तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख चिपळूण सुशांत साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थान परिसरातील विविध विकासकामे, राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित प्रलंबित कामे आणि विभागनिहाय अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत जिल्हाधिकारी श्री मनुज जिंदाल यांनी सर्व प्रलंबित कामे प्राधान्याने व निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यामुळे श्री क्षेत्र परशुराम येथील विकासकामांना अधिक गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



