पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करा ; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे नागरिकांना आवाहन
टंचाई नियोजनासाठी आढावा बैठकीत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश

रत्नागिरी : “निसर्गाने समृद्ध असलेल्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सध्या काही गावांमध्ये निर्माण झालेली पाण्याची परिस्थिती ही तात्पुरती आहे. मात्र, पावसाचे आगमन लांबल्यामुळे सद्यस्थितीत उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी विहिरी, विंधन विहिरी आणि नळाच्या पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा. ‘पाणी बचतीचा’ हा निर्णय प्रशासनाला सहकार्य म्हणून प्रत्येक नागरिकाने पाळावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
पाऊस लांबल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाणी टंचाई नियोजनाबाबत जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली.
बैठकीत जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध साठा, इतर स्त्रोतांमधील पाणीसाठा आणि आवश्यक पाणी पुरवठा याबाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात सध्या काही शहरांसाठी पुढील २५ ते ३० दिवस पुरेल इतकाच पिण्याचा पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती यावेळी संबंधित नगर परिषद/ पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली.
नगरपालिका, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीने आपापल्या क्षेत्रातील गावांचे सर्वेक्षण करावे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उपलब्ध स्त्रोत आणि टँकरने करावा लागणारा पुरवठा याबाबतचा अहवाल आजच सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
टंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे नियोजन करा, आसे सांगून जिल्हाधिकारी श्री जिंदाल म्हणाले, रिसॉर्ट्स आणि होम स्टे यांचे जलतरण तलाव (स्विमिंग पूल) असतील, तर त्यांचा नॉन-फूड रिलेटिव्ह पाणी पुरवठा त्वरित थांबवावा. लोटे एमआयडीसी परिसरातील नागरिक आणि बाहेरून आलेल्या कामगारांच्या पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन एमआयडीसी असोसिएशनने आपली मागणी कार्यालयाकडे नोंदवावी, जेणेकरून त्याचे योग्य नियोजन करता येईल.
सार्वजनिक पाणी स्त्रोतांच्या ५०० मीटर परिसरामध्ये असणारे इतर पाण्याचे सोर्स किती आहेत, याची माहिती जल आराखड्यात समाविष्ट करण्याची सूचनाही आज देण्यात आली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचा आढावा घेऊन टंचाईग्रस्त गावांमधील पाणी पुरवठ्याबाबत आढावा घ्यावा. त्याबाबतची मागणी कळवावी, अशी सूचनाही जिल्हाधिकारी श्री जिंदल याःनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली.
या बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता अनिरुद्ध जोशी, कार्यकारी अभियंता विवेक सोनार, मुख्याधिकारी वैभव गारवे, फेडरेशन ऑफ रत्नागिरी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राज आंब्रे, संचालक शिरीष चौधरी, राजेश तिवारी आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि नगरपरिषद/ नगर पंचायतींचे मुख्याधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झालेले होते.



