मुख्य बातमी

काळबादेवी जिल्हा परिषद मराठी शाळा व अंगणवाडीत ठाकरे युवासेनेच्या वतीने मोफत छत्री वाटप

शैक्षणिक प्रवासात तुमच्या पाठीशी आम्ही खंबीर : प्रसाद सावंत यांनी दिला शब्द

रत्नागिरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनाचे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा काळबादेवी यांच्या विशेष सहकार्याने, जिल्हा परिषद मराठी शाळा आणि अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम आज अत्यंत उत्साही आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला.पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हक्काची छत्री मिळाल्यामुळे शालेय विद्यार्थी आणि चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला.

या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी संघटना नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासित केले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या शिक्षणावर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. तुमच्या यशाच्या प्रत्येक मार्गावर आणि शैक्षणिक प्रवासात युवासेना अत्यंत खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी आहे.

या समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन शिरगाव विभाग युवती अधिकारी सौ. दिव्या अजिंक्य सुर्वे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. कार्यक्रमाला युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, तालुका युवती अधिकारी युक्ता आंबेकर, उपविभाग अधिकारी आराध्य नेवरेकर, काळबादेवी शिवसेना शाखाप्रमुख अजिंक्य सुर्वे, तसेच युवासेनेचे पदाधिकारी सिद्धांत मयेकर आणि निमिष मयेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील आणि अंगणवाडीतील गरजू विद्यार्थ्यांना पावसाळ्यात ही अत्यंत आवश्यक मदत मिळाल्याबद्दल काळबादेवी मराठी शाळेचे शिक्षक आरेकर सर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. युवासेनेने सामाजिक बांधिलकी जपत बालकांना दिलेला हा आधार कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांनी शाळेच्या वतीने युवासेनेचे विशेष आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!