मुख्य बातमी

गणपतीपुळे समुद्रात ५ पर्यटक बुडाले

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी पाच जण बुडाल्याची घटना आज (२० जून) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यातील दोघांना वाचविण्यात यश आले आल्याची माहिती मिळत असून, उर्वरित तिघांचा शोध घेण्यासाठी प्रशासन आणि जीवरक्षकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास यातील काही सदस्य समुद्रात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याचा वेग आणि लाटांचा अंदाज न आल्याने पाचजण खोल पाण्यात ओढले गेले. ही गोष्ट लक्षात येताच किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी तसेच तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.

मात्र, समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, समुद्रात सध्या पाण्याचा प्रबळ प्रवाह (करंट) असल्याने शोधमोहिमेला अडचणी येत आहेत. तरीही स्थानिक प्रशासन, पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने बोटींच्या सहाय्याने बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पर्यटकांनी समुद्रात उतरताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!