इसवली पाथरवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुखरूप सुटका

लांजा : तालुक्यातील इसवली पाथरवाडी येथे सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाने रविवारी दुपारी सुखरूप सुटका केली. विहिरीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यानंतर पशुवैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इसवली गावातील ग्रामस्थ अक्षय गुरव यांनी २१ जून रोजी सकाळी सुमारे ११.४० वाजण्याच्या दरम्यान इसवली पाथरवाडी येथील सार्वजनिक विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती लांजा वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाने तत्काळ हालचाली सुरू करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. त्यानंतर लांजा वनपरीमंडळाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर बिबट्याच्या सुरक्षित सुटकेसाठी विहिरीमध्ये दोरीच्या सहाय्याने लोखंडी पिंजरा सोडण्यात आला. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर बिबट्या पिंजऱ्यात सुरक्षितपणे अडकला. त्यानंतर पिंजरा वर ओढून बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात आले. दुपारी १२.३५ वाजेपर्यंत संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.
सुटका करण्यात आलेल्या बिबट्याची सहाय्यक आयुक्त पशुवैद्यकीय अधिकारी लांजा डॉ. सुहास अनुसे यांनी वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत सदर बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे दीड वर्ष असल्याचे निष्पन्न झाले. तर बिबट्या पूर्णपणे सुस्थितीत असल्याने वनविभागाने त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
ही कारवाई विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये लांजा वनपाल धुळू कोळेकर, वनरक्षक नमिता कांबळे, वनरक्षक श्रावणी पवार, रेस्क्यू टीम सदस्य अमित लांजेकर व सागर साळवी यांनी कार्यवाही केली. याप्रसंगी इसवली गावचे पोलीस पाटील दत्ताराम आपणकर, सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, अशा प्रकारच्या घटना घडल्यास अथवा कोणताही वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९०९६५७८७६१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी केले आहे.



