जगबुडी नदीवर पूरपूर्व तयारी; आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज
खेड नगरपालिकेने घेतली रंगीत तालीम

खेड : गेले १४ दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने दोन दिवसांपूर्वी दमदार पुनरागमन केले. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन खेड प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जगबुडी नदीपात्रात पूरपूर्व तयारीचा भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शनाखाली खेड नगरपालिकेने घेतलेल्या या सरावात नगरपालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दल, विसर्जन कट्टा टीम, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच अनुभवी पोहणाऱ्यांनी सहभाग घेतला. संभाव्य पूरस्थितीत बचावकार्य अधिक प्रभावी आणि गतिमान कसे करता येईल, याचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले.
पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करणे, बोटींच्या साहाय्याने अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे, जीवनरक्षक उपकरणांचा वापर, आपत्कालीन परिस्थितीत विविध विभागांमधील समन्वय आणि मदतकार्याची कार्यपद्धती यांचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास जीवित व वित्तहानी कमी करण्याच्या दृष्टीने यंत्रणांची तयारी तपासण्याचा उद्देश या रंगीत तालीमेमागे होता.
या वेळी खेड पालिकेचे मुख्याधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी पूरस्थितीचा आढावा घेत संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक साधनसामग्री आणि मनुष्यबळ सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, जगबुडी नदीच्या वाढत्या पाणीपातळीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य पूरस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि बचाव पथके पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



