महाराष्ट्रमुख्य बातमी

ज्येष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री, रंगकर्मी विजया मेहता यांचे मुंबईत निधन

मुंबई : मराठी नाट्यसृष्टीचा सुवर्णकाळ आपल्या अद्वितीय दिग्दर्शनाने आणि शिस्तीने गाजवणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता (९२ वर्षे) यांचे निधन झाले. विजयाबाईंनी मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने भारतीय प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरील एक मार्गदर्शक आणि दिग्गज व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असून, संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे.

४ नोव्हेंबर १९३४ रोजी बडोदा इथे जन्मलेल्या विजया मेहता (पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत) यांनी मुंबई विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ मधून नाट्यशास्त्राचे रीतसर शिक्षण घेतले होते. प्रख्यात नाट्य प्रशिक्षक इब्राहिम अल्काझी यांच्या त्या पट्टशिष्या होत्या. नाट्यवर्तुळात त्या ‘बाई’ या नावाने अत्यंत आदराने ओळखल्या जात. १९६० च्या दशकात त्यांनी नाटककार विजय तेंडुलकर, डॉ. श्रीराम लागू आणि अरविंद देशपांडे यांच्यासोबत ‘रंगायन’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने मराठीत प्रायोगिक रंगभूमीची एक मोठी चळवळ उभी केली आणि मराठी नाटकांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

विजयाबाई या केवळ दिग्दर्शिका नव्हत्या, तर त्या उत्तम अभिनय गुरू होत्या. त्यांच्या शिस्तीच्या मुशीतून आणि मार्गदर्शनाखाली नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, सुहास जोशी, भारती आचरेकर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार घडले. ‘बॅरिस्टर’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘मुधराक्षस’, ‘सखाराम बाईंडर’ यांसारखी त्यांची अनेक नाटकं मराठी रंगभूमीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली. नाटकांसोबतच त्यांनी चित्रपट माध्यमातही मोलाचं योगदान दिले. त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘पेस्तनजी’ आणि ‘रावसाहेब’ हे हिंदी चित्रपट कमालीचे गाजले.

तसेच गोविंद निहलानी यांच्या ‘पार्टी’ या चित्रपटातील त्यांची भूमिका आणि ‘स्मृतिचित्रे’ ही मराठी टेलिफिल्म आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. ‘झिम्मा’ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रचंड वाचकप्रिय ठरले. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. विजयाबाईंच्या निधनाचे वृत्त समजताच नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांनी आणि दिग्गजांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “मराठी रंगभूमीला आधुनिक आणि प्रगतीशील विचार देणाऱ्या, आम्हाला बोट धरून चालायला शिकवणाऱ्या आमच्या ‘बाई’ गेल्या, ही न भरून निघणारी हानी आहे,” अशा शब्दांत अनेक कलाकारांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!