रा. भा. शिर्के प्रशालेत स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : येथील रा.भा. शिर्के प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन साजरा केला. स्वयंशासन दिनी छात्र मुख्याध्यापक आदिती सावंत तर छात्र उपमुख्याध्यापक संकेत पवार, पर्यवेक्षक आरुणी दुधाळे आणि सेवक म्हणून संघराज जाधव आणि राज पालकर यांनी जबाबदारी सांभाळली.
याप्रसंगी विद्यार्थी गौरेश कोकरे, अत्रेय देवस्थळी, पार्थी मेहेंदळे, यांनी सादरीकरण केले. नियोजनाप्रमाणे सर्व छात्र शिक्षकांनी आपल्याला आलेले तास विविध वर्गामध्ये जाऊन घेतले आणि या सर्व छात्र शिक्षकांच्या तासाचे नियमित शिक्षकांनी परीक्षण केले. छात्र शिक्षक म्हणून अथर्व खापरे आणि मिनाक्षी पवार यांनी शिक्षकाची जबाबदारी पूर्ण करताना आलेले अनुभव सर्व विद्यार्थ्यांसमोर कथन केले. खुशी केळकर या विद्यार्थिनीने छात्र शिक्षकांनी कसे शिकवले याबद्दल मनोगत व्यक्त केले. शिक्षक राजेश आयरे यांनी मनोगतातून परीक्षण केलेल्या छात्र शिक्षकांचे कौतुक केले. छात्र शिक्षकांमधून आदर्श शिक्षिका म्हणून रिद्धी लिंगायत, तर आदर्श शिक्षक म्हणून समीर कुवर आणि राज जाधव यांना विभागून देण्यात आले. सेवक म्हणून जबाबदारी सांभाळणारे संघराज जाधव आणि राज पालकर या सर्व विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. सूत्रसंचालन छात्र शिक्षिका श्रेया वाडकर हिने केले. ए. पी. चव्हाण यांनी प्लास्टिकचा पुनर्वापर याबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक के. डी. कांबळे, उपमुख्याध्यापिका सौ. पी. एम. पवार, पर्यवेक्षिका सौ. पी. एस. कांबळे आणि सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि आर्मीमध्ये लेफ्टनंट या पदावर रुजू झालेले अनिकेत वाडकर यांनी प्रशालेला भेट दिली. त्यांचे मुख्याध्यापकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांना भविष्यात संरक्षण क्षेत्रात कसे जावे यासंदर्भात विशेष मार्गदर्शन केले आणि एन.सी.सी. विभागातील माजी शिक्षक श्री. पाटील आणि श्री. गद्रे यांचे आभार मानले आणि आजच्या छात्र शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.


