मुख्य बातमी

मराठी शाळा संवर्धनाचा संदेश देणारी गणेश सजावट

भोसले परिवाराच्या सजावटीतून ‘मराठी शाळा टिकवा, मातृभाषा वाचवा’चा संदेश

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संदेश देण्याची परंपरा कोकणात आजही जपली जात आहे. याच परंपरेला पुढे नेत खरडेवाडी, मेर्वी येथील भोसले परिवाराने (प्रतीक भोसले) यंदाच्या गणेश सजावटीतून कोकणातील मराठी शाळांचे संवर्धन आणि मातृभाषा जपण्याचा प्रभावी संदेश दिला आहे.

‘मराठी शाळा टिकवा, तेव्हाच मराठी मातृभाषा टिकेल’ हा संदेश केंद्रस्थानी ठेवून भोसले परिवाराने गणेश सजावट साकारली. कोकणातील अनेक मराठी शाळांसमोर निर्माण झालेली विद्यार्थीसंख्या, शाळांचे अस्तित्व आणि मराठी माध्यमाबाबतची बदलती मानसिकता या पार्श्वभूमीवर या सजावटीच्या माध्यमातून मराठी शाळांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

 

या सजावटीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी राबविण्यात आलेला विशेष उपक्रम. प्रत्येक भाविकाने आपले पूर्ण नाव मराठी मातृभाषेत लिहावे तसेच पूर्ण मराठीमध्ये स्वाक्षरी करावी, असे आवाहन करण्यात आले. केवळ गणेशदर्शनापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात वापर वाढावा आणि आपल्या नावाची, स्वाक्षरीची नाळ मातृभाषेशी जोडली जावी, हा यामागील उद्देश आहे.

गणेश सजावटीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा हा अभिनव प्रयत्न भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. सजावट पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मराठी शाळा, मराठी भाषा आणि मातृभाषेच्या संवर्धनाचा विचार करण्याची संधी या उपक्रमातून मिळत आहे.

खरडेवाडी क्रीडा मंडळ, मुंबई-मेरवी, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य गणेश सजावट स्पर्धेत भोसले परिवाराच्या या सजावटीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या निमित्ताने श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान, रत्नागिरी यांच्या पदाधिकारी मंडळाने भोसले परिवाराच्या गणेश सजावटीला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी सहभागी भोसले परिवाराला सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील विविध प्रश्नांवर जनजागृती करण्याचे प्रभावी माध्यम ठरू शकतो, हे भोसले परिवाराच्या या सजावटीतून अधोरेखित झाले आहे. ‘मराठी शाळा वाचल्या तरच मराठी भाषा आणि मातृभाषेची पुढील पिढीशी असलेली नाळ कायम राहील’, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!