हरवलेले पाकीट तब्बल आठ महिन्यांनी मूळ मालकाला जसेच्या तसे परत
खेडमधील रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार

खेड : आठ महिन्यांपूर्वी हरवलेले पाकीट त्यातील रोख रक्कम व साहित्यासह जसेच्या तसे मूळ मालकाला परत करत रिक्षा चालक सिकंदर कुंभार्लीकर यांनी समाजात प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी, अहमद चौगुले यांचे आठ महिन्यांपूर्वी पाकीट हरवले होते. त्यात चार हजार दोनशे रुपयांसह अन्य महत्त्वाचे कागदपत्र होते. भारतीय जनता पार्टी (भाजपा) रिक्षा संघटनेचे रिक्षा चालक सिकंदर कुंभार्लीकर यांना हे पाकीट सापडले. आठ महिन्यानंतर हे पाकीट जसेच्या तसे सिकंदर कुंभार्लीकर यांनी चौगुले यांना परत केले.
श्री. कुंभार्लीकर यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल अहमद चौगुले यांनी सिकंदर कुंभार्लीकर यांचा सत्कार केला. यावेळी भाजपा नेते तथा खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, युसूफ चौगुले, वहिद चौगुले, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगरपालिकेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, साजिद रावल, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार उपस्थित होते.
समाजामध्ये एक चांगला आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न सिकंदर कुंभार्लीकर यांनी केला. असाच प्रामाणिक पणा आपल्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये इतर सगळ्याच रिक्षाचालकांनी करावा, असे भाजपा नेते ॲड. खेडेकर यांनी सांगितले.



