मुख्य बातमी

कमी स्क्रीन टाईम आणि मोबाईलचा दक्षतेने वापर केल्यास सायबर गुन्हे कमी घडतील : एपीआय (सायबर) तुषार जाधव 

रत्नागिरी : सायबर गुन्ह्यांना आळा घालायचा असेल, तर प्रत्येक व्यक्तीने किंवा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने सामाजिक माध्यम, संगणक आणि मोबाईल अतिशय दक्षतेने वापरले पाहिजे. त्याचबरोबर आपला स्क्रीन टाईम सुद्धा कमी केला पाहिजे, असे रत्नागिरी पोलीस सायबर गुन्हेगारी विभागाचे एपीआय तुषार जाधव यांनी सांगितले.

नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण ज्युनिअर ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायन्स आयोजित कार्यक्रमात “सायबर सुरक्षा आणि आपली जबाबदारी” या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले

यावेळी मार्गदर्शन करताना एपीआय श्री. जाधव यांनी सायबर गुन्हा कसा घडतो, सध्याचे चोरीचे स्वरूप, डिजिटल अरेस्ट ही संकल्पना काय आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड कसा होऊ शकतो, लोन ॲपमध्ये कशा पद्धतीने फसवले जाते, गेमॲप्स वापरत असताना कशा पद्धतीने पैशाची मागणी केली जाते, सेक्शुअल हॅरॅशमेंट कशी केली जाते, ऑनलाइन शॉपिंग करताना कशी फसगत होते यांचा परामर्श घेत याबाबतीत प्रत्येक व्यक्तीने कोणाची मदत घ्यावी याबद्दलची सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमात पोलीस हवालदार रोहन कदम यांनी मोबाईल किंवा अन्य तत्सम साधनांचा वापर करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी त्यावर उपलब्ध असलेल्या उपाययोजना यावर मार्गदर्शन केले.

नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. हेगशेट्ये यांनी विद्यार्थ्यांनी सावधगिरीने या सर्व गोष्टी हाताळाव्यात कोणत्याही प्रकारची फसगत होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या अनुषंगाने मोबाईलचा कसा वापर करावा सायबर गुन्हेगारीपासून दूर कसे राहता येईल या दृष्टीने मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख सुकुमार शिंदे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका लाड कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. इसरा लांबे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!