मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

भरधाव थारची महिलेला धडक; लोटे एमआयडीसीजवळ अपघात

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर लोटे एमआयडीसी परिसरात भरधाव वेगाने चालविलेल्या महिंद्रा थार रॉक्स वाहनाने ४५ वर्षीय अनोळखी महिलेला समोरून धडक दिल्याची घटना ६ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून, वाहनाचेही किरकोळ नुकसान झाले आहे. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात २४ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९.१० वाजण्याच्या सुमारास आरोपी आरिफ इसाक साठविलकर (वय ३७, रा. धरलेमाण, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) हा महिंद्रा थार रॉक्स (क्र. एमएच ०९/जीयू ७२७५) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून खेडकडून चिपळूणच्या दिशेने जात होता.

लोटे एमआयडीसी येथील कॉर्टवा कंपनीसमोर महामार्गावरून जात असताना त्याने वाहन भरधाव व हयगयीने चालविल्याचा आरोप आहे. यावेळी मध्यवर्ती दुभाजकाजवळून खेडच्या दिशेने जात असलेल्या अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी महिलेला थार वाहनाने समोरून धडक दिली. या धडकेत महिलेला किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.

अपघातातील जखमी महिलेचे नाव व गाव अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजित संतोष पोहेकर यांनी फिर्याद दिली आहे. खेड पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(३) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!