मुख्य बातमी

श्रावणधारेत रंगली रत्नागिरीची काव्यमैफल

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग (रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग)आणि संकल्प कलामंच, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रावणधारा’ या साहित्यिक उपक्रमात रत्नागिरीतील साहित्यरसिक मंत्रमुग्ध झाले.

सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती रत्नागिरी कोकण विभागाचे प्रमुख अरूण मोर्ये, संकल्प कलामंच रत्नागिरीचे अध्यक्ष विनयराज उपरकर, उपाध्यक्षा रक्षिता पालव,कोमसाप रत्नागिरी शाखा युवाशक्ती प्रमुख गुरुदेव नांदगावकर , संकल्प कलामंचचे बाबा साळवी, चंदू कांबळे, सत्यविजय शिवलकर, धनवंत कासेकर, विनायक लाकडे, जेष्ठ अभिनेत्री अनुया बाम आदी मान्यवर उपस्थित होते.

या काव्यस्पर्धेत अपर्णा गोगटे प्रथम, उमा जोशी द्वितीय, श्री .उमेश मोहिते तृतीय तर वैजयंती पाटील यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. विजेत्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व लेखणी देऊन गौरविण्यात आले. तर सहभागी सर्व कवींना सन्मानपत्र व लेखणी देऊन गौरविण्यात आले.

श्रावणातील निसर्ग, पाऊस, सण-परंपरा आणि मानवी भावविश्व यांचा सुरेख संगम या काव्यमैफलीत अनुभवायला मिळाला.

या कार्यक्रमात अनेक जेष्ठ व युवाकवींनी आपल्या कविता सादर केल्या. पावसातील निसर्गसौंदर्य, अतिवृष्टीचे प्रसंग, पावसामुळे बदलणारी धरतीची विविध रूपे तसेच श्रावणातील सण, व्रत-वैकल्ये आणि सांस्कृतिक परंपरा अशा विविध विषयांची प्रभावी गुंफण कवींनी आपल्या कवितांमधून केली.

या कवितांचे परीक्षण रत्नागिरीतील सुप्रसिद्ध कवयित्री सुनेत्रा जोशी यांनी केले. ज्येष्ठ कवींसोबतच अनेक युवाकवींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या काव्यप्रतिभेची झलक रसिकांसमोर सादर केली. त्यामुळे ‘श्रावणधारा’ या कार्यक्रमाला अनुभव आणि नव्या सर्जनशीलतेचा सुंदर मेळ लाभला.

रत्नागिरीसारख्या सुजाण रसिक असलेल्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहरातील साहित्य, नाट्य आणि कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच साहित्यप्रेमी रसिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. कवींच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिल्याने संपूर्ण वातावरण काव्यमय झाले होते.

श्रावणाच्या सरींसोबत शब्दांची बरसात घडवून आणणाऱ्या ‘श्रावणधारा’ या उपक्रमाने रत्नागिरीच्या साहित्यिक वातावरणात एक वेगळीच रंगत निर्माण केली.

या निमित्ताने कोमसाप युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग प्रमुख अरूण मोर्ये यांनी उपस्थित सर्व कवींच्या कवितांचे रसग्रहण करून आपली स्वरचित कविता “नवरंगाचा उघडून पंखा हा श्रावण आला दारी” ही गेय कविता सादर केली. तसेच संकल्प कलामंचे अध्यक्ष विजयराज उपरकर यांनी स्वागत करताना व सुनेत्रा जोशी यांनीही आपल्या मनोगतात कविता सादर केल्या.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमसाप रत्नागिरी शाखा युवाशक्ती प्रमुख गुरुदेव नांदगावकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन चंदू कांबळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!