मुख्य बातमी

कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी साधला राजापूरच्या विद्यार्थ्यांशी संवाद

रत्नागिरी : चैतन्यमयी रंग, कल्पक रेषा आणि त्यातून उमटलेला लोकशाहीचा उत्कट संदेश… राजापूरच्या नगर वाचनालयातील वातावरण आज एका अनोख्या लोकजागराने भारून गेले होते. कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी ‘स्वीप’ (SVEEP) उपक्रमांतर्गत आयोजित मतदार जनजागृती प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी केवळ रांगोळ्यांची पाहणी न करता, लोकशाहीच्या भावी शिल्पकारांशी म्हणजेच शालेय विद्यार्थ्यांशी थेट, सहज आणि आपुलकीचा संवाद साधला.

या समयी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अपर आयुक्त फरोग मुकादम, सिंधुदुर्ग अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल कबनुरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, राहुल गायकवाड, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, प्रांताधिकारी विश्वजित गाताडे, तहसीलदार विकास गंबरे आदी अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी जमिनीवर रांगोळीच्या रंगांतून मतदानाचा हक्क, कर्तव्यभाव आणि निवडणूक साक्षरतेचे प्रभावी पैलू अतिशय नजाकतीने रेखाटले होते. विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी प्रत्येक कलाकृतीजवळ क्षणभर थांबून ती अत्यंत आत्मीयतेने न्याहाळली. एका रांगोळीजवळ जमिनीवर खाली बसून त्यांनी विद्यार्थिनींकडे ‘SIR’ (मतदार यादी पुनरिक्षण) संकल्पना आणि ‘व्होटर हेल्पलाइन’च्या रेखाटनामागील नेमका मथितार्थ जाणून घेतला. शाळकरी मुलांनीही कोणताही संकोच न बाळगता, डोळ्यांत चमक ठेवून लोकशाही मूल्यांची आणि निवडणूक प्रक्रियेची माहिती अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडली. विद्यार्थ्यांचा हा प्रगल्भ आत्मविश्वास पाहून उपस्थित अधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांची मुक्तकंठाने पाठ थोपटली.

केवळ भाषणातून नव्हे, तर कलेच्या माध्यमातून लोकशाहीची मुळे नव्या पिढीच्या मनात खोलवर रुजवणारा हा उपक्रम प्रशासकीय कर्तव्य आणि संवेदनशीलतेचा एक सुंदर संगम ठरला. विद्यार्थ्यांच्या संवेदनशील कल्पकतेचे आणि जागृतीच्या या रंगोत्सवाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!