रत्नागिरी जिल्ह्यात ‘३० वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानाला सुरुवात
१०० दिवसांत एनसीडी स्क्रीनिंगवर भर

रत्नागिरी : ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात ‘३० वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ हे १०० दिवसांचे विशेष असंसर्गजन्य आजार (एनसीडी) स्क्रीनिंग अभियान १ सप्टेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ३० वर्षे व त्यावरील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान व वेळेत उपचार उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
अभियानांतर्गत नागरिकांची रक्तदाब, रक्तातील साखर, वजन, उंची व BMI यांसारख्या आवश्यक आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच पात्र नागरिकांची गृहभेटीद्वारे तोंडाचा, स्तनाचा व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यासाठी प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान आजाराचा संशय आढळल्यास संबंधित नागरिकांना पुढील तपासणी व उपचारासाठी शासकीय आरोग्य संस्थेत संदर्भित करण्यात येणार आहे.
उच्च रक्तदाब व मधुमेह यांसारखे असंसर्गजन्य आजार सुरुवातीच्या काळात अनेकदा कोणतीही ठळक लक्षणे न देता वाढत राहतात. त्यामुळे आजाराची लक्षणे दिसण्याची वाट न पाहता नियमित आरोग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. ‘मला काही त्रास नाही, म्हणजे मी पूर्णपणे निरोगी आहे’ हा गैरसमज टाळून ३० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने एनसीडी तपासणी करून घ्यावी.
रत्नागिरी जिल्ह्यातील आयुष्मान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय या शासकीय आरोग्य संस्थांच्या माध्यमातून अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नागरिकांमध्ये जनजागृती करून पात्र नागरिकांना तपासणीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अस्मिता केंद्रे यांनी आवाहन केले आहे की, “३० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने तपासणी करून निरोगी कुटुंब व निरोगी समाज घडविण्यास हातभार लावावा. त्यासाठी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन मोफत तपासणीचा लाभ घ्यावा.”
जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांनी सांगितले, “आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आजारी पडण्याची वाट न पाहता नियमित आरोग्य तपासणी करा. एनसीडी स्क्रीनिंग अभियानाचा लाभ घ्या आणि निरोगी राहा.”
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी आवाहन केले आहे की, “नियमित तपासणीसोबत संतुलित आहार, व्यायाम आणि व्यसनमुक्त जीवनशैली अंगीकारा. निरोगी जीवनासाठी एनसीडी तपासणीला प्राधान्य द्या.”
‘आजची तपासणी, उद्याचे निरोगी आयुष्य’ या संदेशासह रत्नागिरी जिल्ह्यातील ३० वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांनी या १०० दिवसांच्या अभियानाचा लाभ घ्यावा आणि आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन मोफत एनसीडी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.



