मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षणात रत्नागिरी जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी; मतदारांनी नावनोंदणी व पडताळणी करावी : विभागीय आयुक्त रुबल अगरवाल

रत्नागिरी : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या अनुषंगाने तसेच जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त तथा रोल ऑब्झर्वर रुबल अगरवाल यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील मतदान केंद्र, ग्रामपंचायत, नगर परिषद तसेच जिल्हा मुख्यालयाला भेट देऊन कामांची सविस्तर पाहणी केली.
कोकण विभागातील ७५ मतदारसंघांमध्ये एकूण २ कोटी ४६ लाख मतदार असून, त्यापैकी सुमारे ७९ लाख मतदारांची पडताळणी (Uncollected) शिल्लक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १३ लाख मतदारांपैकी केवळ १.३१ लाख (१० टक्क्यांपेक्षा कमी) मतदार अनकलेक्टेड आहेत. मतदार यादीच्या डिजिटायझेशनमध्ये १०० टक्के उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने रत्नागिरी जिल्हा राज्यात आघाडीवर असून, या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.
मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी उपलब्ध असलेला एक महिन्याचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असून, ग्रामपंचायत व नगरपालिका स्तरावर ‘स्वीप’ (SVEEP) अंतर्गत जनजागृती मोहीम अधिक गतिमान करण्याचे निर्देश देण्यात आले.
ज्या नागरिकांची नावे मतदार यादीत नाहीत, त्यांनी ‘नमुना ६’ (Form 6) भरून नाव नोंदवावे तसेच दुरुस्ती असल्यास संबंधित अर्ज सादर करावा. मतदारांनी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत आपले नाव तपासावे; काही हरकती किंवा अडचणी असल्यास संबंधित ईआरओ (ERO) अथवा एईआरओ (AERO) कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली. तसेच आदर्श शाळेला भेट देऊन तेथील उपक्रमांचे कौतुक केले व अशा शाळांचा आदर्श इतर शाळांनी घ्यावा असे नमूद केले. महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन ज्या भागात वसुली कमी झाली आहे, तेथे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून कडक कारवाई करण्याचे आणि वसुली वाढवण्याचे सक्त निर्देश दिले. सर्वपक्षीय राजकीय प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन मतदार यादी पुनरीक्षणाबाबतच्या त्यांच्या शंका व सूचनांचे निरसन केले.
रोल ऑब्झर्वर म्हणून प्रत्येक टप्प्यावर या प्रक्रियेची पाहणी करण्यात येणार असून, नागरिकांनी व प्रतिनिधींनी आपल्या काही सूचना असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.



