मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

सर्पदंश झालेल्या मंडणगड येथील १४ वर्षीय अक्षयला वालावलकर रुग्णालयात जीवदान

चिपळूण : मंडणगड येथील इयत्ता ९ वीत शिकत असलेला अक्षय मोरे रात्री घरात झोपी गेलेला होता. याचवेळी मध्यरात्री च्या दरम्यान घराच्या छतावरून अंगावर पडलेल्या नागाने पोटावरच दंश केला. त्यावेळी अक्षयला झोपेतच होता. या दरम्यान त्याला श्वास घेताना त्रास होऊ लागला, डोळे उघडता येईनात. तोंडातून लाळ गळू लागली. पोटात देखील दुखू लागले. त्याला तातडीने मंडणगड येथील स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला २५ वायल अँटी-स्नेक व्हेनम (ASV) देण्यात आले; मात्र उपचारानंतरही त्याच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला, प्राणवायू चे प्रमाण कमी झाले. त्यामुळे पुढील उपचारांसाठी त्याला बी.के.एल. वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात दाखल होताना अक्षयला पापण्यांचा पडदा पडणे (Ptosis) व त्यानंतर दुहेरी दिसणे (Diplopia) अशी न्यूरोटॉक्सिक विषारी सर्पदंशाची लक्षणे दिसून आली. पुढे त्याला श्वसनाची तीव्र अडचण व श्वसनदमन (Respiratory depression) निर्माण झाले. त्याच्या छातीच्या एक्स-रेमध्ये फुफ्फुसात पाणी साचल्याचे (Pulmonary edema) निदर्शनास आले. त्याच्या हृदयाची कार्यक्षमता मंदावली होती. त्यामुळे फुफुसात पाणी भरले होते.

 

रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेऊन वालावलकर रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने तातडीने पुढील उपचार सुरू केले. त्याला सर्पदंश नाशक औषधे देण्यात आली. त्यानंतरही अपेक्षित सुधारणा न झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्राणवायू, फुफुसतील पाणी काढणारी औषधे, इको कर्डिओ ग्राफी आणि सर्पदंश नाशक अँटी स्नेक व्हेनंम औषधे पुन्हा देण्यात आले. अशाप्रकारे अक्षय ची गंभीर परिस्थिती पाहून वैद्यकीय पथकाने अत्यंत नाजुकपणे अती दक्षता विभागात उपचार दिले.

 

तज्ज्ञ डॉक्टरांच्या सततच्या देखरेखीखाली आवश्यक उपचार, श्वसनाचे व्यवस्थापन आणि सपोर्टिव्ह केअर देण्यात आली. उपचारांना प्रतिसाद देत अक्षयच्या प्रकृतीत पुढील दोन दिवसांत लक्षणीय सुधारणा झाली. त्याचे डोळे पूर्ण उघडले व श्वास घेणे सुलभ झाले. हातापायाची हालचाल सुरळीत झाली आणि त्याची प्रकृती स्थिर झाली. दोन दिवसातच अक्षयची प्रकृती स्थिर झाली आणि अक्षयला जीवदान मिळाल्याने त्याचे आई वडील रुग्णालयाचे आभार मानू लागले.

 

अक्षयची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती कारण वडील मजुरी करून पोट भरत होते. त्यामुळे रुग्णालयाकडून सर्व उपचार महात्मा फुले योजने अंतर्गत मिळाल्यामुळे कुटूंबीयांचा आर्थिक भार हलका झाला. त्यामुळे गंभीर न्यूरोटॉक्सिक सर्पदंश होऊनही जीवनदान मिळू शकले. याशिवाय पालकांनी वेळेत योग्य निर्णय घेऊन ताबडतोब अतिदक्षता विभागात तज्ञ डॉक्टरांकडे आणल्यामुळे कुठेही वेळेचा अपव्यव न होता तात्काळ उपचार झाल्याने अक्षय बरा झाला. अक्षयवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकात तज्ञ वैद्यकीय अधिकारी अमित वाधवा, डॉ. संकेत, डॉ. श्रीयांस याचा समावेश होता.

सर्पदंश झाल्यास तात्काळ रुग्णाला चांगल्या रुग्णालयात दाखल केल्यास त्याचा जीव वाचू शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी अशा घटना घडल्यानंतर वेळ वाया न घालवता अशा रुग्णांना इतरत्र न घेऊन जाता तात्काळ चांगल्या रुग्णालयात दाखल करा, असे आवाहन रुग्णालयाच्या संचालिका सौ. सुवर्णा पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!