महाराष्ट्राच्या युवाहृदयसम्राटावरील वार परतवण्यास युवासैनिक सज्ज
युवासेना माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत

रत्नागिरी : आज जे आदित्य ठाकरेंच्या बाबतीत सुरू आहे, तो केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नाही, तो महाराष्ट्राच्या अस्मितेवर, मराठी तरुणाच्या भविष्यावर केलेला हल्ला आहे. का? कारण फक्त एकच आदित्य ठाकरे विकले गेले नाहीत, झुकले नाहीत किंवा घाबरलेही नाहीत. जेव्हा एखादा योद्धा शरण येत नाही, तेव्हा त्याला बदनाम करण्याचे हे घाणेरडे राजकारण सुरू होते. हाच इतिहास आहे. हेच षडयंत्र आहे; मात्र तुम्ही कितीही जंग पछाडा विजय नेहमी सत्याचाच होतो, “सत्यमेव जयते” हेच खरे. यापुढे आदित्य ठाकरे यांच्यावर विनाकारण टीका सहन केली जाणार नाही, असा सज्जड इशारा रत्नागिरी युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी दिला आहे.
गेल्या काही वर्षांपासून एकच पॅटर्न सुरू आहे. काहीही पुरावा नाही, काहीही तथ्य नाही, फक्त मीडिया ट्रायल, फक्त बदनामी. हिंमत असेल तर पुराव्यासह समोर या, असे आवाहन देतानाच आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही संयमी आहोत, सुसंस्कृत आहोत, पण आम्हाला दुबळं समजू नका, असेही श्री. सावंत यांनी ठणकावले आहे.
ते म्हणाले, “आमच्या सहनशीलतेला मर्यादा आहे. आम्ही खूप दिवस पाहिलं. आता बस झालं. आता यापुढे प्रत्येक खोट्या आरोपाला जशास तसे उत्तर दिले जाईल. तुम्ही एका व्यासपीठावरून बदनामी कराल, आम्ही हजार व्यासपीठांवरून सत्य सांगू. तुम्ही एका चॅनेलवर खोटं पसरवाल, आम्ही घरोघरी जाऊन खरं पोहोचवू. आदित्य साहेबांना एकटं पाडण्याचा तुमचा डाव कधीही यशस्वी होणार नाही. समुद्र शांत दिसतो, पण जेव्हा उसळतो तेव्हा मोठमोठी जहाजं बुडवतो. हीच आमच्या रक्तातली शिवसेना आहे. हे दिल्लीश्वरानी आणि त्यांच्या महाराष्ट्रातील चेल्यांनी लक्षात ठेवावे.”
संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील युवासेना आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी भिंतीसारखी उभी असल्याचे आश्वासन माजी युवासेना जिल्हाप्रमुख श्री. सावंत यांनी दिले.



