समर्थ शिंदे याची स्केटिंगमध्ये उत्तुंग झेप

आबलोली (संदेश कदम) : प्रचंड मेहनतीने आणि जिद्दीने यश खेचून आणता येते हे सिद्ध केले आहे गुहागर तालुक्यातील देवघर गावचा सुपुत्र समर्थ अस्मिता प्रशांत शिंदे याने. स्केटिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत १०० मीटर इनलाईन स्केटिंग बॅकवर्ड हा प्रकार १७.९३ सेकंदात पूर्ण करत वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या कामगिरीची नोंद करत समर्थ शिंदे यांने नवा इतिहास घडवला आहे. त्यामुळे देवघर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
लहान वयातच स्केटिंगमध्ये आवड निर्माण होणाऱ्या समर्थने सराव करत शिस्त, चिकाटी आणि जिद्दीने जागतिक विक्रम केला असून आई-वडिलांच्यासह देवघर गावाचे, गुहागर तालुक्याचे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे नाव चमकवले आहे. समर्थच्या या उज्वल यशाबद्दल विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समर्थचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



