मेर्वी गुरववाडी प्राथमिक शाळा इमारतीच्या प्रतीक्षेत

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गुरववाडी या सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेला अद्याप इमारतीची प्रतीक्षा आहे. शाळेला इमारत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या शाळेला स्वतंत्र इमारत नसून सद्यस्थितीत ही शाळा बालवाडी इमारतीत भरत आहे.
या शाळेची शैक्षणिक प्रगती उत्तम असून, दरवर्षी या शाळेतील मुलं स्पर्धा परीक्षा मंथन, स्काॅलरशिप आणि अन्य परीक्षेत भाग घेऊ शाळेचा १०० टक्के निकाल लागत आहे. शाळेमध्ये भौतिक सुविधा पुरेशा उपलब्ध नसतानाही शाळेतील मुलं उत्तुंग प्रगतीची झेप घेत आहेत.
या शाळेला इमारत मिळावी म्हणून मेर्वी ग्रामपंचायतीकडून वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. या प्रस्तावाची दखल घेऊन जिल्हा शिक्षण विभाग प्रशासनाने जा.क्र.रजिप./. शिक्षण/प्राथ/ टे.१/७८५/२०२५ दिनांक २८/०१/२०२५ या प्रत्रानुसार शिफारस करून पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे इमारत निधी उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी केली होती; परंतु अद्याप निधी मंजूर झालेला नाही.
चालू सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून या शाळेला निधी उपलब्ध होईल या आशेने या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थ मोठ्या आशेने वाट पाहत आहेत.



