मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम) : खरवते-दहिवली (ता. चिपळूण) येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात नव्याने प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला सकारात्मक व प्रेरणादायी सुरुवात मिळावी, या उद्देशाने दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून नवोदित विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, अभ्यासक्रम, विविध शैक्षणिक उपक्रम, प्रात्यक्षिक शिक्षण, प्रयोगशाळा सुविधा तसेच कृषी क्षेत्रातील आधुनिक संधींची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करून आपले ज्ञान, कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकसित करावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी अनिरुद्ध निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कृषी शिक्षणाचे बदलते स्वरूप आणि कृषी क्षेत्रातील वाढत्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान, कृषी उद्योजकता, संशोधन व प्रक्रिया उद्योग यांचा अभ्यास करून भविष्यात रोजगार निर्माते बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिस्त, सातत्य, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन या बाबी यशासाठी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. तसेच कृषी शिक्षणातील विविध संधी, कौशल्याधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच प्रात्यक्षिक ज्ञान आत्मसात करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी विभाग प्रमुख डाॅ. हरिश्चंद्र भागडे यांनी सर्व मान्यवर व पालक प्रतिनिधींचे स्वागत केले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या दीक्षारंभ कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या शैक्षणिक पर्वाबद्दल उत्सुकता, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!