आर्टिकल

संघर्षाच्या खडतर वाटेवर मायेची सावली माझी आई – दीपाली दाते

आयुष्य म्हणजे परीक्षाच असते. कधी कधी ती परीक्षा खूप कठीण असते. आयुष्य अनेकदा अनपेक्षित वळणावर उभे करते, जिथे खचून जाण्यापेक्षा झुंज देण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. माझ्या आईचे दिपाली दाते यांचे आयुष्य हे अशाच एका संघर्षाची, जिद्दीची आणि आम्हा बहीण भावावरच्या प्रेमापोटी तिने केलेल्या खडतर कष्टाची गाथा आहे. आज माझी आई एसटी महामंडळाच्या सेवामधून वयाची ५८ वर्षे पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहे. पण हा तिचा प्रवास सोपा किंवा योजून ठेवलेला नव्हता. ही वाट तिला निवडावी लागली होती, आणि त्यावरून तिने कष्टाने प्रवास केला.

एका बाजूला पतीचे अचानक झालेले निधन आणि पदरात एक मोठी मुलगी आणि एक मुलगा अशी दोन लहान अपत्ये… अशा अत्यंत कठीण परिस्थितीतून तिने हा २६ वर्षांचा खडतर प्रवास पूर्ण केला आहे. माझ्या न कळत्या वयापासूनचा हा प्रवास आहे, हे आठवले की आजही मन अभिमानाने भरून येते.

१५ जुलै १९९९ रोजी आमच्या कुटुंबावर वज्राघात झाला. माझे वडील कर्तव्यावर असताना एका अपघाताचा शिकार झाले. बसच्या पुलावरून प्रवाशांनी खाली फेकल्यामुळे त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यात आमचे संपूर्ण विश्व उद्ध्वस्त झाले होते. पदरात दोन लहान मुले होती आणि भविष्याची कोणतीही खात्री नव्हती. सोबत सासूबाई मंगला दाते यांनी दाखवलेला विश्वास, पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या नणंदा वासंती सहस्रबुद्धे आणि पुष्पा नामजोशी यांच्या साथीने अशा बिकट परिस्थितीत खचून न जाता, आईने कुटुंबाचा ताबा आपल्या खांद्यावर घेतला. वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर तिला २० मार्च २००० रोजी रत्नागिरी आगारात नोकरीची संधी मिळाली. हा केवळ एका नोकरीचा आरंभ नव्हता, तर आईने तिच्या मुलांसाठी निवडलेल्या संघर्षाची ती सुरुवात होती.

एकीकडे आम्हा भावंडांचे शिक्षण, त्यांना वाढवण, मोठं करणं ही जबाबदारी एकट्या खांद्यावर असताना आईने रत्नागिरी आगारात अगदी शून्यापासून कामाची सुरुवात केली. यासाठी आम्हाला मदत झाली ती आमचे नातेवाईक सुरेश काका बेहरे आणि रजू आते बेहरे यांची. त्यांनी आमच्या परिवाराला खूप मदत केली.

नोकरीत रुजू झाल्यावर आईने सुरुवातीला साधारण नऊ वर्षे रिझर्व्हेशन खिडकीवर तिने प्रामाणिकपणे काम पाहिले. त्यानंतर कॅश सेक्शन (वाहकांना रकमा देणे), चालक-वाहक भरणे (मिसळकाम), आणि आगारातील डेली ऑपरेशन्स (DOR) यांसारखी महत्त्वाची व जबाबदारीची कामे तिने समर्थपणे पार पाडली.

केवळ एकाच जागी न थांबता, तिने स्वतःमधील जिद्द कायम ठेवली. घरातील व अन्य सर्व कठीण जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच तिने ‘सवानि’ (सहाय्यक वाहक निरीक्षक) पदाची परीक्षा दिली आणि ती यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन विभागीय अंतर्गत वाहतूक शाखा येथे ‘सवानि’ म्हणून पदोन्नती मिळवली. सन २०१३ ते २०१८ या कालावधीत तिने वाणिज्य शाखेचे काम पाहिले. त्यानंतर डिसेंबर २०१८ ते २०२३ पर्यंत तिने अपघात शाखेचे कामकाज सांभाळले. याच कालावधीत तिने TI (वाहतूक निरीक्षक) परीक्षा पास होऊन अपघात शाखेचे काम पाहिले आणि ATS (सहाय्यक वाहतूक अधीक्षक) या पदाची परीक्षाही दिली.

काही कारणास्तव तत्कालीन विभाग नियंत्रकांच्या सांगण्यावरून तिने पुन्हा वाणिज्य शाखेचे कामकाज सांभाळले आणि अखेर डिसेंबर २०२५ पासून ‘सहाय्यक वाहतूक अधीक्षक’ (ATS) या पदाची धुरा सांभाळत ती आजतागायत कार्यरत राहिली. एसटी महामंडळामध्ये तब्बल २६ वर्षे ६ महिने अशी दीर्घ, निष्कलंक आणि कर्तृत्ववान सेवा पूर्ण करून, दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्याने ती सेवानिवृत्त होत आहे.

 

नोकरीची ही सर्व आव्हाने पेलत असताना तिने आम्हाला कधीही आईच्या प्रेमाची उणीव जाणवू दिली नाही. कार्यालयातील ताणतणाव, कामकाज आणि यासोबतच घरा-दाराची जबाबदारी या सगळ्याचा समतोल साधत तिने मला आणि माझ्या ताईला भाग्यश्री दाते- पाध्ये हिला अत्यंत उत्तम संस्कारांसह मोठे केले. आमच्या शिक्षणात कोणताही खंड पडू दिला नाही. आज आम्ही जे काही आहोत, ते केवळ आणि केवळ तिच्या त्यागामुळे आणि कष्टांमुळेच आहोत हे सांगताना मन भरून येते आहे.

 

पतीचे छत्र हरपल्यानंतरही तिने कधीही न खचता, स्वतःच्या कष्टावर आणि प्रामाणिकपणावर आमचे आयुष्य उभे केले. एका स्त्रीने, एका आईने आणि एका कर्तबगार महिलेने केलेली ही कामगिरी आम्हा सर्वांसाठीच अत्यंत प्रेरणादायी आहे.

आई, तुझा हा २६ वर्षांचा सेवाकाळ आणि तुझा हा खडतर संघर्ष आम्हा भावंडांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल. आज तू सेवानिवृत्त होत असताना, तुझे आयुष्य हे आमच्यासाठी एक खुले पुस्तक आहे. आयुष्य कसे जगावे याचे मूर्तिमंत उदाहरण आहेस, माझा आदर्श आहेस. तुझ्या पुढील निरोगी, सुखकर आणि दीर्घ आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा!

– तन्मय दाते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!