मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

मुंबई-गोवा महामार्गावर बोरघर येथे एर्टिगाची जेसीबीला जोरदार धडक

२२ वर्षीय युवक जखमी; कारचे मोठे नुकसान, महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील बोरघर (ता. खेड) येथे आज (८ ऑक्टोबर) दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास एर्टिगा कारने महामार्गावरील कामासाठी तैनात असलेल्या जेसीबीला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील सौरभ भागोजी टोणे (वय २२, रा. कवठे महांकाळ, जि. सांगली) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोरघर येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या दुभाजकाच्या मध्यभागी झाडे लावण्यासाठी खड्डे काढण्याचे काम सुरू होते. यासाठी जेसीबी महामार्गावर कार्यरत होता. त्याचवेळी मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या एर्टिगा कारने (क्र. एमएच ०३ एफडी २४५२) जेसीबीला जोरदार धडक दिली.

यात एर्टिगा कारचे मोठे नुकसान झाले. कारमधील सौरभ टोणे जखमी झाल्याने त्यांना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. टोणे हे मूळचे कवठे महांकाळ, जिल्हा सांगली येथील असून ते पाटणच्या दिशेने जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, अपघाताच्या वेळी महामार्गावर खड्डे काढण्याचे काम सुरू असताना वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कामाच्या ठिकाणी बॅरिकेड्स, दिशादर्शक फलक, चेतावणी फलक किंवा वाहतूक वळविण्याची व्यवस्था करण्यात आली होती का, याबाबतही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

महामार्गावर वाहतूक सुरू असतानाच काम सुरू असल्याने वाहनचालकांना कामाच्या ठिकाणाची पूर्वसूचना मिळणे आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे या अपघाताच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणेकडून कामाच्या ठिकाणी करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी होणे आवश्यक आहे.

सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली. मात्र, महामार्गावरील सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांकडे पुरेसे लक्ष दिले जात आहे का? हा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. अपघाताचे नेमके कारण आणि कामाच्या ठिकाणी करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबतची अधिकृत माहिती संबंधित यंत्रणांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!