राजापूर येथे ‘सेवा संकल्प अभियाना’तंर्गत रक्तदान शिबिर

राजापूर : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘सेवा माझे योगदान’ या विशेष उपक्रमांतर्गत राजापूर ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर व आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद देत २० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रमाचे आयोजन सहायक निबंधक सहकारी संस्था राजापूर, राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्यादित राजापूर, राजापूर तालुका जनकल्याण सहकारी पतसंस्था मर्यादित राजापूर आणि राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
शिबिरादरम्यान रक्तदान केलेल्या सर्व दात्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिकांना तज्ज्ञांमार्फत आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन देण्यात आले.
या उपक्रमाला सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. अजय परदेशी आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
याशिवाय राजापूर तालुका कुणबी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश मांडवकर, राजापूर तालुका महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन शीतल पटेल, राजापूर तालुका जनकल्याण सहकारी पतसंस्थेचे चेअरमन हरिश्चंद्र शिवगण यांच्यासह तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार क्षेत्रातील संस्थांनी एकत्र येत सामाजिक उत्तरदायित्व म्हणून राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



