आगवे मोरेवाडी-गुरववाडी येथील सुखादेवी मंदिरात पारंपारिक पद्धतीने दसरा उत्साहात साजरा
सोने लुटून ‘सुखादेवी माते की जय’चा जयघोष : दहा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

लांजा : तालुक्यातील आगवे मोरेवाडी-गुरववाडी येथील सुखादेवी मंदिरात दसरा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी पारंपरिक पद्धतीने सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला.
‘सुखादेवी माते की जय’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. दसऱ्यानिमित्त बालगोपाळांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांनी एकमेकांना आपट्याची पाने देत सोन्याच्या रूपात शुभेच्छांची देवाणघेवाण केली. पारंपरिक प्रथा आणि धार्मिक श्रद्धा जपत ग्रामस्थांनी दसरा सणाचा आनंद लुटला. यावेळी सुखादेवी मातेच्या दर्शनासाठी दशक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
गेल्या दहा दिवसांपासून सुखादेवी मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आरती, भजन, भोवत्या तसेच टाळ-मृदुंगाच्या तालावर रंगलेल्या भक्तिमय कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध गुणगौरव कार्यक्रमांमुळे या उत्सवाला सांस्कृतिक रंगही लाभला.सामाजिक कार्यकर्ते तथा मंडळाचे सचिव अनिल गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. ग्रामस्थ आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दसरा उत्सव भक्तिभावाने आणि पारंपरिक वातावरणात पार पडला.



