दिवाळीच्या सुट्टीत रंगणार ‘दुर्गोत्सव २०२६’
गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून नागरिकांनी सहभागी होण्याचे 'अमृत'चे आवाहन

रत्नागिरी : महाराष्ट्राची समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शौर्यपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच गड-किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी आगामी दिवाळीच्या सुट्टीत ‘दुर्गोत्सव २०२६’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत नागरिक आपल्या घरी, गृहसंकुलात, शैक्षणिक परिसरात अथवा उपलब्ध मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून सहभागी होऊ शकतात. या उपक्रमासाठी ५ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया राबवली जाणार असून, नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘अमृत’चे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक संतोष मधुकर जुवळे यांनी केले आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सन २०२५ मध्ये ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ (Maratha Military Landscapes of India) या नामांकनांतर्गत महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मानाचे स्थान मिळाले आहे. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर यंदाच्या ‘दुर्गोत्सव’ उपक्रमाला विशेष सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
दुर्गोत्सवात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी https://www.amrutdurgotsav.com/ या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. सहभागींनी स्वतः तयार केलेल्या किल्ल्याच्या प्रतिकृतीसोबत आपला फोटो अथवा सेल्फी काढून, अचूक वैयक्तिक व संपर्क माहितीसह संकेतस्थळावर अपलोड करावयाचा आहे. प्राप्त सर्व नोंदणी आणि छायाचित्रांची संबंधित संस्थेमार्फत प्राथमिक पडताळणी केली जाईल. नोंदणी वैध आढळल्यास संबंधितांना डिजिटल स्वरूपातील अधिकृत ‘अभिनंदन पत्र’ प्रदान करण्यात येईल.
किल्ल्याची प्रतिकृती स्वतः तयार केलेली असणे अनिवार्य आहे. इंटरनेट किंवा सोशल मीडियावरून डाऊनलोड केलेली छायाचित्रे/व्हिडिओ आढळल्यास नोंदणी तत्काळ रद्द करण्यात येईल. छायाचित्रात किल्ल्याची प्रतिकृती आणि सहभागी व्यक्ती स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. किल्ला तयार करताना सार्वजनिक रस्ते, पादचारी मार्ग, अग्निशमन आपत्कालीन मार्ग किंवा सार्वजनिक जागांवर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही तसेच कोणत्याही मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रतिकृती तयार करण्यासाठी मुख्यत्वे पर्यावरणपूरक आणि सुरक्षित साहित्याचा वापर करावा.
या उपक्रमात कोणतीही व्यक्ती, कुटुंब, सामाजिक संस्था, गृहसंकुल, शैक्षणिक संस्था किंवा गट सहभागी होऊ शकतात. हा सहभाग पूर्णपणे ऐच्छिक स्वरूपाचा आहे. देण्यात येणारे डिजिटल अभिनंदन पत्र हे केवळ सहभागाची अधिकृत नोंद म्हणून दिले जाणार असून, यातून कोणताही आर्थिक लाभ, रोख पारितोषिक अथवा कायदेशीर हक्क निर्माण होणार नाहीत, असे ‘अमृत’ संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


