मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

रत्नागिरीपाठोपाठ राजापूर न्यायालयालाही बॉम्बची धमकी

न्यायालयाची इमारत पोलिसांकडून रिकामी; बॉम्बशोधक पथकाकडून कसून तपासणी

राजापूर : रत्नागिरी जिल्हा न्यायालयापाठोपाठ आता राजापूर येथील दिवाणी व कनिष्ठ स्तर न्यायालयालाही ई-मेलद्वारे बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने राजापूरच्या प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत न्यायालयाची संपूर्ण इमारत रिकामी केली. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच विविध कामांसाठी आलेल्या पक्षकारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

रत्नागिरी जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर राजापूर न्यायालयालाही अशाच प्रकारचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी तातडीने न्यायालय परिसरात धाव घेत सुरक्षा व्यवस्था ताब्यात घेतली.

सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालयातील सर्वांना बाहेर काढल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाकडून न्यायालयाच्या इमारतीतील प्रत्येक खोली, कोपरा आणि परिसराची कसून तपासणी सुरू करण्यात आली. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

या अचानक घडलेल्या प्रकारामुळे राजापूर न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. न्यायालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांचीही मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

प्राथमिक माहितीनुसार, अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल राज्यातील इतरही काही न्यायालयांना प्राप्त झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले जात असून पोलीस व प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

दरम्यान, धमकीच्या ई-मेलमागील नेमके कारण काय, हा संदेश कोठून पाठविण्यात आला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास सुरू आहे. न्यायालयाच्या इमारतीत प्रत्यक्षात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली आहे का, याबाबत अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!