हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आंबा व काजू बागायतदारांसाठी दापोली कृषी विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण कृषी सल्ला

रत्नागिरी : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे आंबा व काजू बागांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील विस्तार शिक्षण संचालनालयाने ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीसाठी आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
आंबा पिकासाठी खबरदारी व उपाययोजना
शेंडे पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण: जिल्ह्यात २३ व २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या अनेक बागांमध्ये नवी पालवी येत असून कोवळ्या फुटीवर शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. अशा ठिकाणी प्रादुर्भाव दिसताच १० लिटर पाण्यात लॅम्बडा सायलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ६ मि.ली. मिसळून फवारणी करावी.
तुडतुडे व करपा रोग व्यवस्थापन: ढगाळ वातावरणामुळे तुडतुड्यांची उत्पत्ती वाढण्याची आणि पालवीवर काळी बुरशी पडण्याची शक्यता असते. यासाठी:
तुडतुड्यांच्या नियंत्रणाकरिता १० लिटर पाण्यात डेल्टामेथ्रीन ९ मि.ली. किंवा टॉलफेनपायराईड २० मि.ली. फवारावे.
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात कार्बन्डाझिम १२ टक्के + मॅन्कोझेब ६३ टक्के (तयार मिश्रण) २० ग्रॅम मिसळून फवारणी करावी.
फवारणीचे औषध पालवीवर व्यवस्थित पसरावे व टिकून राहावे यासाठी द्रावणात ‘स्टीकर’ आणि ‘स्प्रेडर’चा वापर करावा.
मोहोरासाठी अनुकूल स्थिती: आगामी आठवड्यात तापमान घटण्याचा अंदाज असल्याने आंब्याला मोहर फुटण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काजू पिकाचे संरक्षण व संवर्धन
ढेकण्या किडीपासून संरक्षण: वेंगुर्ला-१, ४, ७, ९ आणि १० या वाणांना नवीन पालवी फुटत असून काही झाडांवर मोहर दिसू लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे ढेकण्या किडीपासून संरक्षणासाठी प्रति १० लिटर पाण्यात लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ६ मि.ली. किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही १० मि.ली. कीटकनाशक मिसळून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बागेची निगा: झाडांच्या बुंध्यातील गवत काढून परिसर स्वच्छ ठेवावा तसेच जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी बुंध्याभोवती सेंद्रिय/जैविक आच्छादन (मल्चिंग) करावे. येत्या काळात थंडी वाढल्यास मोहोराचे प्रमाण अधिक वाढेल. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी संपर्क:* शेतकरी बांधवांनी अधिक तांत्रिक माहितीसाठी डॉ. वैभव शिंदे (मोबाईल: 94224 25727) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.



