मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’चे अर्ज ‘महाडीबीटी २.०’ प्रणालीवर सुरू
योजनांचा लाभ घेण्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे आवाहन

रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी राज्यस्तरीय व जिल्हा वार्षिक योजनांचा सर्वसमावेशक आढावा घेऊन शासनाने ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ राज्यात राबविण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मत्स्यव्यवसाय विभागाच्या लाभार्थीभिमुख २४ योजनांसाठी ‘महाडीबीटी २.०’ (https://mahadbt.maharashtra.gov.in/) या प्रणालीवर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. या योजनांचा जास्तीत जास्त मत्स्यशेतकरी व मच्छीमारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
राज्यातील मत्स्यव्यवसायिकांचे जीवनमान उंचावणे, शाश्वत आर्थिक समृद्धी मिळवून देणे, मत्स्यशेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालणे, अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे आणि उद्योजकतेला चालना देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. विशेषतः शेती उत्पन्नाच्या अनिश्चिततेच्या काळात शेतकऱ्यांना, प्रामुख्याने अल्पभूधारक व लहान शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा पूरक स्रोत यातून उपलब्ध होणार आहे.
या योजनेअंतर्गत भूजलाशयीन, निमखारे पाणी व सागरी मत्स्यव्यवसायाकरिता ६ राज्यस्तरीय, १९ जिल्हास्तरीय आणि ३ जिल्हास्तरीय योजनांमध्ये सुधारणा अशा एकूण २८ योजनांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ४ राज्यस्तरीय, १८ जिल्हास्तरीय व २ जिल्हास्तरीय योजनांमध्ये सुधारणा अशा एकूण २४ योजनांसाठी पारदर्शक व सुलभ पद्धतीने ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
प्रशासकीय प्रक्रियेचे सुलभीकरण, अनावश्यक कागदोपत्री प्रक्रिया कमी करणे, गतिमान डिजिटल सेवा देणे आणि विभागांमधील माहितीची देवाणघेवाण सुलभ व्हावी या हेतूने या योजनांचे ‘जीपीआर’ (Government Process Re-engineering) करण्यात आले आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
महाडीबीटी क्रमांक (Maha ID) प्राप्त करणे: महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक प्राथमिक नोंदणी करून स्वतःचा महाडीबीटी आयडी प्राप्त करावा.
प्रोफाइल तयार करणे: पोर्टलवर लॉग-इन करून वैयक्तिक व आवश्यक ती सर्व माहिती भरून प्रोफाइल अद्ययावत करावे.
योजनेसाठी अर्ज करणे: प्रोफाइल पूर्ण झाल्यावर ‘Apply for Scheme’ पर्यायावर जाऊन ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ निवडून आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज सादर करावा.
योजनेची माहिती देणे, महा आयडी (Maha ID) तयार करणे आणि अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे जागेवरच निरसन करण्यासाठी जिल्हा कार्यालयात ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. यासाठी खालील संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लतिका सुरेश गावडे, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (मो. क्र. ९१५२५६२९७६), रसिका रवींद्र सावंत, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (मो. क्र. ८८३०७४८८९८).
जिल्ह्यातील सर्व पात्र मत्स्यव्यवसायिक, मत्स्यशेतकरी, मच्छीमार व इच्छुकांनी विहित मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रांसह महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.



