मुख्य बातमी

० ते १८ या वयोगटांतील बालकांसाठी दिव्यांगत्व निदान शिबिरांचे आयोजन

रत्नागिरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये ० ते १८ या वयोगटांतील बालकांसाठी दिव्यांगत्व निदान शिबिरांचे आयोजन बाल न्याय समिती, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र आर. पाटील यांनी दिली.

या शिबिरामध्ये शारीरिक, बौद्धिक, विकासात्मक दिव्यांगत्व असलेल्या ० ते १८ या वयोगटातील बालकांची युनिक डीसॲबिलीटी आयडी कार्डसाठी (UDID) तपासणी करण्यात येऊन UDID कार्ड वितरित करण्यात येणार आहे. जेणेकरून या बालकांना आवश्यकते व पात्रतेनुसार सहाय्यक साधने वितरित करता येतील.

या शिबिरात दिव्यांग बालकांसाठी असलेल्या सर्व विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देखील देण्यात येईल. शिबिरांचे वेळापत्रक असे : लांजा : ३ ऑक्टोबर सकाळी १० वाजता ग्रामीण रुग्णालय, लांजा. राजापूर : ४ ऑक्टोबर सकाळी १० वाजता ग्रामीण रुग्णालय, राजापूर. संगमेश्वर : ६ ऑक्टोबर १० वाजता ग्रामीण रुग्णालय, देवरुख. गुहागर : ७ ऑक्टोबर सकाळी १० वाजता ग्रामीण रुग्णालय, गुहागर. रत्नागिरी ८ ऑक्टोबर सकाळी १० वाजता शासकीय रुग्णालय, रत्नागिरी. चिपळूण ९ ऑक्टोबर सकाळी १० वाजता कामथे आरोग्य केंद्र. खेड : १४ ऑक्टोबर सकाळी १० वाजता उपजिल्हा रुग्णालय, खेड. मंडणगड : १५ ऑक्टोबर १० वाजता ग्रामीण रुग्णालय, मंडणगड. दापोली १६ ऑक्टोबर सकाळी १० वाजता उपजिल्हा रुग्णालय, दापोली.

या शिबिरात बालकांना आणण्यापूर्वी लांजा व राजापूर तालुक्यातील दिव्यांगांनी ग्रामीण रुग्णालय पाली, गुहागर तालुक्यासाठी ग्रामीण रुग्णालय गुहागर, चिपळूण व संगमेश्वर तालुक्यासाठी उपजिल्हा रुग्णालय कामथे, खेड व मंडणगड तालुक्यांसाठी उपजिल्हा रुग्णालय खेड, दापोली तालुक्यासाठी उपजिल्हा रुग्णालय दापोली व रत्नागिरी तालुक्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी या प्रमाणे www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करताना सेंटर निवड करायची आहे. नाव नोंदणीसाठी काही अडचण आल्यास जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, रत्नागिरी 9834440200 येथे स. १० ते ६ या वेळेत संपर्क करावा. तपासणीसाठी सोबत संकेतस्थळावर नावनोंदणी केल्याची प्रत, आधार कार्ड प्रत, आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल क्रमांक, रत्नागिरी जिल्ह्यातील रेशनकार्ड, पासपोर्ट साईज फोटो सोबत घेऊन यावे.

या शिबिरापासून कोणतेही गरजू व पात्र बालक सुटणार नाही याची काळजी संबंधित अंगणवाडी सेविका व विशेष शिक्षिका यांनी घ्यायची आहे, अशा सूचना रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. व्ही. वाय. जाधव, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!