राजापूर पंचायत समितीच्या पंचायत समितीच्या बारा गणांचे आरक्षण जाहीर
सभापतीपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

राजापूर : राजापूर पंचायत समितीच्या एकूण १२ गणांच्या काढण्यात आलेल्या आरक्षणामध्ये काहींना तारले तर काहींच्या पदरी निराशा पडली. येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये ५ सर्वसाधारण, ४ सर्वसाधारण महिला, २ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि १ नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षित झाले आहेत. यावेळी राजापूर पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षित झाले असून, ताम्हाणे आणि नाटे हे दोन गण त्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजापूरचा पुढील सभापती या दोन गणांपैकी असणार आहे.
राजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीला राजापूरच्या उपविभाग अधिकारी डॉ. जैस्मिन, तहसीलदार विकास गंबरे, नायब तहसीलदार विलास सरफरे, राजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जाधव, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार पांडुरंग शिद, यासह तहसील कार्यालयीन कर्मचारी मंगेश परांजपे, बाजीराव पाटील यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
राजापूर पंचायत समितीमध्ये एकूण १२ गण असून त्यामध्ये वडदहसोळ, रायपाटण, तळवडे, ताम्हाणे, केळवली, जुवाटी, धोपेश्वर,पेंडखले, नाटे, साखरीनाटे, अणसुरे, कातळी यांचा समावेश होतो.
सुरवातीला राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे यांनी आरक्षण कसे काढले जाणार याची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार लहान विद्यार्थिनीला पाचारण करण्यात आले होते. तिच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या आणि राजापूर पंचायत समितीच्या एकूण १२ गणांचे आरक्षण काढण्यात आले.
या जाहीर झालेल्या आरक्षणानुसार वडदहसोळ, रायपाटण, धोपेश्वर, पेंडखले, कातळी हे सर्वसाधारण गण, अणसुरे, साखरी नाटे, तळवडे केळवली हे चार गण सर्वसाधारण, महिला म्हणून जाहीर झाले, तर नाटे आणि ताम्हाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला आणि जुवाटी नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून आरक्षित झाले.
राजापूर पंचायत समितीचे सभापतीपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे यापूर्वीच जाहीर झाले असून त्या प्रभागात येणाऱ्या नाटे आणि ताम्हाणे पंचायत समिती गण राजापूरचा पुढील सभापती ठरवतील हे निश्चित झाले आहे.
मनाजोगे आरक्षण पडल्याने अनेकांना नशिबाने साथ दिली, तर काही ठिकाणी अपेक्षित आरक्षण न पडल्याने काहींच्या पदरी निराशा पडली. तालुक्यातील वडदहसोळ, रायपाटण, तळवडे, केळवली, जुवाटी, धोपेश्वर, पेंडखले, कातळी आदी पंचायत समिती गणात मोठी चूरस निर्माण झाली असून तेथे इच्छुकांची भाऊ गर्दी पहावयास मिळणार आहे. तर उर्वरित पंचायत समिती गणात मनाजोगे आरक्षण न पडल्याने काहींच्या पदरी निराशा आली आहे.
राजापूर पंचायत समिती आरक्षण असे : वडद हसोळ – सर्वसाधारण. रायपाटण – सर्वसाधारण. तळवडे – सर्वसाधारण, महिला. ताम्हाणे – नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला. केळवली – सर्वसाधारण, महिला. जुवाटी – नागरिकांचा मागास प्रवर्ग. धोपेश्वर – सर्वसाधारण. पेंडखले – सर्वसाधारण. नाटे- नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला. साखरीनाटे- सर्वसाधारण, महिला. अणसुरे – सर्वसाधारण, महिला. कातळी – सर्वसाधारण.



