मुख्य बातमी

रत्नागिरी नगरपालिकेत पारदर्शक कामकाज होणार याची खात्री : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : “आम्ही जनतेच्या मनातला उमेदवार दिला आहे. नगरपालिकेत पारदर्शक कामकाज होणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी शिल्पा सुर्वे यांची निवड केली आहे, पुढच्या एक वर्षांत नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकही चांगली कामगिरी दाखवतील. आज जमलेली गर्दी बघता आमचा विजय आजच निश्चित झालेला आहे,” असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. भाजप–शिवसेनेची नैसर्गिक युती टिकवण्यात आम्ही यशस्वी झाल्याचेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी काल (१७ नोव्हेंबर) जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत महायुतीची भूमिका, उमेदवारीची कारणमीमांसा आणि विविध राजकीय घडामोडींवर स्पष्ट मांडणी केली.

येत्या वर्षभरात नगरसेवकांचा परफॉर्मन्स दिसलाच पाहिजे. शहरात अनेक विकासकामे सुरू आहेत. येत्या दोन महिन्यांत रत्नागिरी शहरात एकही खड्डा दिसणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.

अथर्व साळवी याच्या नाकारलेल्या उमेदवारीबाबत बोलताना त्यांनी सावध भूमिका घेतली. “माजी राजन साळवी यांचे चिरंजीव अथर्व हे युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य आहेत. प्रभाग क्रमांक १५ मधून ते इच्छुक होते. मात्र तिथे भाजपचे विद्यमान नगरसेवक संकेत (मुन्ना) चवंडे यांना शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आली. हा निर्णय राजन साळवी, त्यांचे बंधू आणि स्वतः अथर्व साळवी यांना विश्वासात घेऊन घेण्यात आला आहे. अथर्व साळवी यांच्यावर भविष्यात कोणताही अन्याय होणार नाही.”

महायुतीतील मतभेद आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यासोबतच्या तणावाबद्दल बोलताना त्यांनी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. अजून काही अर्ज मागेही घेतले जातील, असे सांगितले.

टीका करणाऱ्यांवर टीका करायची नसते. काळ हेच त्याला उत्तर देईल, असा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी माजी आमदार बाळ माने यांचे नाव न घेता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!