मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापूर नगरपालिकेसाठी ५ नगराध्यक्षपदासह ६९ उमेदवारी अर्ज दाखल

राजापूर : नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांनी गर्दी केली होती. लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी महायुती व महाविकास आघाडीसह अपक्ष असे ५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर १० प्रभागातील २० नगरसेवकपदांच्या जागांसाठी एकूण ६५ उमेदवारांचे ६९ अर्ज दाखल झाले आहेत.

राजापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रकिया सुरू झाली होती. मात्र राजकीय पक्षांनी सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली. महायुती व महाविकास आघाडीने आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सर्व नगरसेवक पदाचे अर्ज दाखल केले.

यामध्ये महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी श्रृती ताम्हनकर, महाविकास आघाडीकडून ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी आपले अर्ज दाखल केले. तसेच नगराध्यपदासाठी अपक्ष म्हणून भाजपाच्या महिला आघाडीच्या शीतल पटेल यांनी जान्हवी करंगुटकर यांनी अर्ज दाखल केले. हिंदु महासभेच्या वतीने ज्योती खटावकर यांनी यापूर्वीच आपला अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

तसेच नगरसेवक पदासाठी १० प्रभागात असलेल्या २० जागांसाठी एकूण ६५ उमेदवारांनी ६९ अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये महायुती व महाविकास आघाडीच्या ४० उमेदवारांसह २५ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. काल (१७ नोव्हेंबर) सायंकाळी उशीरापर्यंत प्रशासनाकडून ही प्रक्रिया सुरू होती.

सोमवारी सकाळपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत नगरपालिकेत दाखल झालेल्या सर्व उमेदवारांचे अर्ज स्विकारून त्यांना टोकन देण्यात आले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत या सर्व उमेदवारांचे अर्जपूर्तता करून घेण्यात आले.

या निवडणूक प्रक्रीयेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निवडणूक निर्णय अधिकारी जयंत जावडेकर, निवासी नायब तहसीलदार विलास सरफरे, महसुल नायब तहसीलदार सायली गुरव, मृणालिनी शेळके, नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, सहा. महसुल अधिकारी मंगेश परांजपे, बाजीराव पाटील, विकास पिठलेकर, संदीप कोकरे, सुरेश डकरे, रोहन कुंभार, अनुष्का जुवेकर आदी अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

राजापूर नगर पालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत असून, निवडणूक चिन्हांचे वाटप २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!