आंबडवे येथे येथे संविधान दिन उत्साहात साजरा

मंडणगड : रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील आंबडवे या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावात ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. या गावामध्ये डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे. गावातील महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राथमिक व माध्यमिक शाळेचे विद्यार्थी या सर्वांच्या सहभागाने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. संविधानाची दिंडी संपूर्ण गावामध्ये फिरवण्यात आली. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांबरोबर नागरिक आणि स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
दिंडीनंतर स्मारक भवनामध्ये झालेल्या “भारतीय संविधान” या विषयावर वेगवेगळ्या वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाविधी प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील यांनी संविधानाविषयी बोलताना मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नागरिकांनी आपल्या मूलभूत अधिकारांविषयी जागरूक असतानाच मूलभूत कर्तव्यांची देखील जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांबरोबर ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह मंडगणड तालुक्याचे गटविकास अधिकारी सुनील खरात, शाळेचे शिक्षक, महाविद्यालयाचे प्रभारी प्रचार्य अमोल राजशिर्के, तलाठी अमोल पाटील, ग्रामसेवक प्रवीण कोंकणे, सरपंच दीपिका जाखल हे सहभागी होते. त्याचबरोबर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे विधी स्वंयसेवक श्रीकांत जोशी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी सौरभ यादव, प्रशांत वारिशे, महेश नागवेकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.



