आरोग्यमुख्य बातमी

रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमातंर्गत सक्रिय क्षयरोग शोधमोहिम सुरू 

रत्नागिरी : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमातंर्गत १० मार्च ते २२ मार्च या कालावधीत जिल्ह्यातील अतिजोखमीच्या भागामध्ये सक्रिय क्षयरोग शोधमोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे नियोजन केले असून सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना सर्व मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.

कुठे होणार मोहीम?

– जिल्ह्यातील चिरेखाणीतील कामगार,कारागृहातील कैदी,दिव्यांग शाळा व वसतिगृह, वृध्दाश्रम,बांधकाम स्थळाच्या ठिकाणी काम करणारे कामगार,आंब्याच्या बागांमधील राखणदार व मजूर ,निर्वासितांची छावणी,औद्योगिक कामगार वसाहत, आदिवासी वाडी वस्ती, पोहचण्यासाठी अवघड गावे आणि वस्त्या, ज्या गावात टीबी रुग्ण जास्त आहेत अशी गावे, आदिवासी शाळा व वसतिगृह, लोकसमुदायातीलच अतिकुपोषित भाग म्हणून ओळख असलेला आदिवासी भाग, एचआयव्ही अतिजोखीम गट, बेघर व रस्त्यावरची मुले, अनाथालय, आदिवासी भागातील कमी हवेशीर असलेल्या झोपड्या, बाल टीबी रुग्णांचे सह्वासित, मागील २ ते ३ वर्षांपासून टीबी रुग्णाच्या संपर्कात व सहवासात असलेली व्यक्ती, ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती, धूम्रपान करणारे, मधुमेही अशा शहरी, ग्रामीण, आदिवासी जोखीमग्रस्त भागाच्या ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत संशयीत क्षयरुग्णांचे थुंकी नमूने व क्ष-किरण तपासणी मोफत करून निदान निश्चितीनंतर त्यांच्यावर मोफत औषोधोपचार सुरू करणे हे मोहिमेचे प्रमुख उद्दीष्ट ठेवलेले आहे. त्यामुळे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवरील गाठ अशा लक्षणांबाबत विचारणा करण्यात येणार आहे. यापैकी लक्षणे आढळल्यास तो संशयीत क्षयरुग्ण म्हणून ओळखला जाईल व त्याचे दोन थुंकी नमूने घेऊन व एक्सरे करिता संदर्भित करून तपासणी अंती निदान निश्चिती करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी दिली आहे.

नागरिकांनी घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आवश्यक योग्य ती माहिती देवून क्षयरोग शोध मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!