मुख्य बातमी

रत्नागिरी रेल्वे स्थानकात तात्काळ तिकीट विक्रीचा काळा बाजार

रेल्वे कर्मचाऱ्यांचेच साह्य : सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा भाजपा शिष्टमंडळाचा इशारा

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे तात्काळ तिकीट विक्री ठिकाणी काळ्या बाजारास रेल्वे कर्मचाऱ्यांचे साह्य मिळते. त्यामुळे हा काळा बाजार जर थांबला नाही तर रेल्वे स्थानकबाहेर येऊन सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजपा शिष्टमंडळाने विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदनाद्वारे दिला.

यासंबंधी भाजपाचे पदाधिकारी सतेज नलावडे, दीपक आपटे, नितीश अपकरे, योगेश गराटे यांनी निवेदन दिले. शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे तत्काळ तिकीट विक्री कक्षात दगडाखाली मागील १-२ महिन्यापासूनचे फॉर्म भरून ठेवलेले आढळतात. तिकीट काळा बाजार करणारे १-२ मिनिटांपूर्वी आयत्यावेळी येऊन आपले ते फॉर्म भरलेले आहेत, असे सांगून पहिल्या नंबरवर तिकीट घेतात व तेथे २-३ तासापासून उभ्या असलेल्या नागरिकांना मागे करतात. सामान्यतः पुढील १/२ नंबरना तत्काळ तिकीट उपलब्ध होऊ शकतात.

काळ्या बाजारातील तिकिटे मग चढ्या भावाने विकली जातात. तत्काळ एसी तिकिट दरापेक्षा ४०० रुपयांपेक्षा जास्त दर) व असे एजंट रत्नागिरीमध्ये आहेत. अशा घटनेवेळी उपस्थित नागरिकांनी आवाज उठवला तर रेल्वे तिकीट कर्मचारी रेल्वे पोलिस बोलवून संबंधित नागरिकास दमात घेतात. वास्तविक, कर्मचाऱ्यांनी हा काळाबाजार थांबवणे जरुरी आहे. परंतु हे कर्मचारी काळ्या बाजारला सहाय्य करतात, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला असून विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. याबाबत रेल्वे मंत्र्यांनाही कळवणार असल्याचे भाजपाच्या वतीने सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!