मुख्य बातमी

लेखणी विसावली, सूर सजले! मानाची पैठणी अन् पत्रकारांच्या गाण्यांची मैफल

'रत्नागिरी पत्रकार स्नेहसंमेल २०२६' दिमाखदार सोहळा

रत्नागिरी : बातम्यांच्या जगातील रोजची धावपळ आणि ताणतणाव बाजूला सारून रत्नागिरीतील पत्रकारांनी ४ जानेवारी रोजी एकत्र येत आपला स्नेहसोहळा साजरा केला. शहरातील रा. भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात ‘रत्नागिरी पत्रकार २०२६’ या टॅगलाईनखाली हे स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमी बातम्यांच्या मागे धावणाऱ्या पत्रकारांनी यावेळी आपल्या कुटुंबासह या सोहळ्याचा आनंद लुटला.

कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली, ज्यामध्ये पत्रकारांनी आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडवले. पत्रकारांनी सादर केलेल्या गायनाच्या कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. केवळ पत्रकारच नव्हे, तर त्यांच्या मुलांनीही विविध कलागुण सादर करून सर्वांची मने जिंकली. या सोहळ्यातील मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे महिला पत्रकार आणि पत्रकारांच्या पत्नींसाठी आयोजित केलेला ‘मानाची पैठणी’ हा खेळ. या खेळात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या खेळामध्ये सौ. दीक्षा दीपक शिंगण यांनी मानाची पैठणी पटकावली. सौ. पूनम विजय पाडावे या उपविजेत्या ठरल्या. त्यांनाही मानाची साडी देऊन गौरविण्यात आले.

या स्नेहसंमेलनात जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, महिला पत्रकार आणि तरुण पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामुळे जुन्या आणि नव्या पिढीतील पत्रकारांचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. एकमेकांशी संवाद साधत आणि जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व पत्रकारांनी विरंगुळ्याचे क्षण अनुभवले. या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि या गोड जेवणानेच संमेलनाची सांगता झाली. एकंदरीतच, ‘रत्नागिरी पत्रकार २०२६’ हे स्नेहसंमेलन पत्रकारांमधील एकोपा वाढवणारे आणि सर्वांच्या स्मरणात राहणारे ठरले.

दरम्यान, पत्रकार स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने पत्रकारांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचा निकाल असा : क्रिकेट – किशोर मोरे यांचा संघ विजेता, आनंद तापेकर यांचा संघ उपविजेता. कॅरम : विजेता – सचिन बोरकर, उपविजेता दीपक कुवळेकर. बुद्धिबळ : विजेता – सचिन सावंत, उपविजेता – निलेश शिरधनकर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!