पाडावेवाडीच्या श्री माघी गणेशोत्सवाचा १४ वा वर्षारंभ
२२ जानेवारीपासून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

रत्नागिरी : तालुक्यातील पाडावेवाडी येथील श्री माघी गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा गणेशोत्सवाचे १४ वे वर्ष मोठ्या थाटामाटात साजरे होत आहे. २२ जानेवारी ते २८ जानेवारी या आठ दिवसांच्या कालावधीत हा उत्सव होणार आहे. या निमित्ताने पाडावेवाडी येथे भक्ती, कला आणि सामाजिक उपक्रमांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळणार आहे.
श्री कालिकादेवी नाट्यकलामंच, मिरजोळे (पाडावेवाडी) यांच्या वतीने या संपूर्ण महोत्सवाचे नेटके व्यवस्थापन करण्यात येत आहे. उत्सवाचा सविस्तर कार्यक्रम खालीलप्रमाणे :
२१ जानेवारी रोजी श्रींचे आगमन. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत श्री गणरायाचे आगमन होणार असून भव्य मिरवणुकीने बाप्पांचे स्वागत केले जाईल. २२ जानेवारी रोजी प्रतिष्ठापना व बहुरंगी नमन. त्यामध्ये सकाळी ९. वा. श्रींची शास्त्रोक्त विधीनुसार प्रतिष्ठापना. रात्री ८ वाजता श्री लक्ष्मीकांतवाडी भजन मंडळ, मिरजोळे यांचा भजनाचा कार्यक्रम. रात्री १०:३० वा. आई कालिकादेवी नमन मंडळ, पाडावेवाडी यांचे ‘बहुरंगी नमन’कार्यक्रम खास आकर्षण असणार आहे.
२३ जानेवारी रोजी भजन व टिपरी नृत्य, रात्री ८ वाजता भजनाचा कार्यक्रम (मधलीवाडी भजन मंडळ, मिरजोळे), रात्री १०:१५ वाजता मधलीवाडी मिरजोळे यांचे टिपरी नृत्य. रात्री ११:३० वा. कालिका मंडळ, पाडावेवाडी यांचे टिपरी नृत्य, हा कार्यक्रम होईल. २४ जानेवारी रोजी महिला व बालसंस्कृती, सायंकाळी ४ वा. महिलांसाठी विशेष हळदीकुंकू समारंभ.
रात्री ८ वा. वरची पाडावेवाडी, मिरजोळे यांचे भजन. रात्री १० वा.: महिला व मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होईल. २५ जानेवारी रोजी सामाजिक उपक्रम व भक्ती, सकाळी ११ वा. रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. रात्री ८ वा. सांब रवळनाथ भजन मंडळ, खानू यांचे भजन. रात्री १० वा. भजनाचा कार्यक्रम होईल.
२६ रोजी खेळ व मनोरंज रात्री ८ वा. महिला व मुलांसाठी मनोरंजक ‘फनी गेम्स’ स्पर्धा होणार आहे. २७ रोजी सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद, हा उत्सवातील मुख्य दिवस असून यावेळी धार्मिक विधींची रेलचेल असेल. सकाळी ११ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा. दुपारी १ ते ३ वा. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन.
सायंकाळी ८ ते ९ वा. कालिकादेवी भजन मंडळ, पाडावेवाडी यांची भजने, रात्री १०:३० वा. शिवराज कलामंच आयोजित श्री विराट विश्वकर्मा नमन मंडळ (संगमेश्वर) यांचा बहुरंगी नमन कार्यक्रम होईल. २८ रोजी विसर्जन मिरवणूक उत्सवाच्या सांगता दिनी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत श्रींची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येईल.
उत्सवाच्या काळात दररोज सायंकाळी ७ वाजता श्रींची आरती होईल. या सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री माघी गणेशोत्सव मंडळ, पाडावेवाडी यांनी केले आहे.



