कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

माणूस जोडण्याचे काम वाचनसंस्कृती करेल : लळीत

ज्ञानसाधना वाचनालयाचे मोरगाव येथे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी : धर्माच्या नावावर केला जाणारा भेदभाव, जातीपाती, राजकारणातील हेवेदावे, जगण्याची स्पर्धा, सोशल मीडियाचा अतिवापर यामुळे दुरावलेला माणूस जोडण्याचे आणि विचारी, विवेकी माणूस घडवण्याचे काम फक्त वाचनसंस्कृतीच करू शकते, असे प्रतिपादन निवृत्त माहिती उपसंचालक व ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी केले.

दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव बौद्धवाडी येथील समता कला क्रीडा मंडळाने सुरू केलेल्या ज्ञानसाधना वाचनालयाच्या उद्घाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या वाचनालयाचे उद्घाटन मोरगाव शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री कुबल यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी सरपंच संतोष आईर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार गोरड, सहायक शिक्षक संतोष गवस, केंद्रप्रमुख सुधीर जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. लळीत यांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.

‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या सक्रीय सहभागातून हे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. यावेळी श्री. लळीत म्हणाले की, आज संपर्कसाधने वाढली असली तरी माणुस दुरावला आहे. राजकारण असो की आणखी काही, प्रत्येक गोष्टीत धर्म आणि जात यांच्या भिंती नव्याने बांधण्याचे काम स्वार्थापायी होत आहे. त्यात मोबाईल आणि वॉटसॲपसारख्या सामाजिक माध्यमांमुळे मनुष्य एका चक्रात सापडून स्वप्रतिमेत अडकला आहे. प्रबोधनाची परंपरा खंडित झाली आहे. अशा विपरित परिस्थितीत पुस्तके आणि वाचनसंस्कृती विचारी आणि विवेकी माणुस घडवू शकेल. म्हणूनच वाचनालये मोठ्या प्रमाणात सुरू होऊन ती चालवली गेली पाहिजेत.

सरपंच संतोष आईर यांनी वाचनालयाच्या उपक्रमाचे कौतुक करून ग्रामपंचायतीतर्फे शक्य ती सर्व मदत केली जाईल, असे सांगितले. मुख्याध्यापिका भाग्यश्री कुबल यांनी शिक्षणाचे जीवनातील महत्त्व सांगून हे वाचनालय ही विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी असल्याचे प्रतिपादन केले. सहायक शिक्षक संतोष गवस, केंद्रप्रमुख सुधीर जोशी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मोरगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार गोरड, सहायक शिक्षक स्वाती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

या वाचनालयातील ग्रंथसंख्या ७५० आहे. या वाचनालयाला श्री. लळीत यांनी ८५ पुस्तके प्रदान केली. त्याचबरोबर त्यांच्या प्रयत्नातून अभिजित राजवाडे (अमेरिका) यांनी ४०, सावित्री जगदाळे (सातारा) यांनी १००, डॉ. आनंद जोशी (बोरिवली) यांनी १३, मंजुषा गाडगीळ (सोलापूर) यांनी ५० तर सुनीता कुलकर्णी (सोलापूर) यांनी ४१ अशी २४४ पुस्तके वाचनालयाला देण्यात आली. या ग्रंथदात्यांचे यावेळी आभार मानण्यात आले. यावेळी प्रमुख कार्यकर्ते प्रमोद पालयेकर, गोविंद कदम, मधुकर कदम, विकी कदम, भगवान कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन बाळकृष्ण कदम यांनी तर सूत्रसंचालन अमोल कदम यांनी केले. पांडुरंग कदम यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!